अकोला : गढूळ, फेसयुक्त पाण्याचा पुरवठा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Contaminated water supply

अकोला : गढूळ, फेसयुक्त पाण्याचा पुरवठा!

अकोला : आठवड्यातून दोनच दिवस पाणीपुरवठा, तोही माती असलेले गढूळ, हिरवे, पिवळे पाणी. त्यालाही फेस, हे पाणी पिणार कसे? बुधवारी शहरातील बहुतांश भागात वेगवेगळा जलकुंभावरून पुरविण्यात आलेले पाणी बघून नागरिकांचा माथाच ठणकला. ऐन पावसाळ्यात दुषित पाण्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अकोला शहराला महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून गोड्या पाण्याचा पुरवठा केला जातो. महान येथेच महानगरपालिकेचे जलशुद्धीकरण केंद्रही आहे. दररोज चार कोटी लीटर पाणी शुद्ध करून शहरातील १३ मोठ्या व पाच लहान जलकुंभावरून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविले जाते. मात्र, गेले काही महिन्यांपासून शहरात दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. संपूर्ण उन्हाळ्यात पिवळ्या रंगाचे पाणी नागरिकांना पुरविण्यात आले. जे पिण्या योग्य नव्हते. याबाबत नागरिकांनी मनपात आंदोलने, निवेदनेही दिली. मात्र, त्यानंतरही पाण्याची गुणवत्ता सुधारली नाही. बुधवारी तर शहरात चक्का माती मिसळलेले व फेस येत असलेल्या पाण्याचा पुरवठा झाला. पावसाळा सुरू झाला असताना असे दुषित पाणी पुरविल्या जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जलशुद्धीकरण केंद्रातूनच दुषित पाणीपुरवठा

काटेपूर्णा प्रकल्पातील पाणी महान येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून अकोला शहरापर्यंत पोहोचविले जाते. मात्र, जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे गेले काही महिन्यांपासून दुषित पाणी शहरातील जलकुंभापर्यंत पोहोचत असून, तेच पाणी नागरिकांना पुरविल्या जात असल्याची माहिती आहे.

शोध घेण्यास लागले वर्ष

जलशुद्धीकरण केंद्रावरून होत असलेल्या पाणी पुरवठ्याची गुणवत्ता चांगली नाही.याबाबत नागरिकांकडून गेले वर्षभरापासून तक्रारी होत आहे. असे असतानाही मनपाच्या जलप्रदाय विभागाला दुषित पाणीपुरवठ्याचे कारण शोधून काढण्यासाठी वर्ष लागले.

आता होणार नवीन प्रक्रिया

अकोला शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेतच बदल करण्यात येत आहे. आता ‘सीएलओ टू’`ही नवीन प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जाणार असल्याची माहिती जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एच.जी. ताठे यांनी दिली.

जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत दोष असल्याने पिवळे पाणी येत होते. त्यावर ‘सीएलओटू’ प्रक्रिया करण्यास आयुक्त कविता द्विवेदी यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत दुषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागून शुद्ध पाणीपुरवठा सुरू होईल.

- एच.जी. ताठे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग, मनपा अकोला

Web Title: Akola Muncipal Contaminated Water Supply Health Issue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..