अकोला : मुसळधार पावसानंतर मनपाला जाग

रविवारी सकाळपासूनच तुंबलेल्या नाल्यांची सफाई; अनेक ठिकाणी प्लास्टिकचा कचरा
Akola muncipal corporation nalla and Plastic waste cleaning camping
Akola muncipal corporation nalla and Plastic waste cleaning campingsakal

अकोला : मॉन्सून सुरू होण्यापूर्वी महानगरपालिका क्षेत्रातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाई होणे अपेक्षित असतानाही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पहिल्याच पावसात शहरातील अनेक नाले तुंबले होते. त्यामुळे नागरिकांच्या घरात घाण पाणी शिरले. या घाण पाण्यासोबतच नागरिकांनी रात्र जागून काढली. रविवारी सकाळपासूनच तुबंलेल्या नाल्यांची सफाई प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. अनेक नाल्यांमध्ये प्लास्टिकचा कचरा असल्याने नाले तुंबल्याचे बघावयास मिळाले.

अकोला महानगरपालिकेतर्फे मॉन्सूनपूर्व सफाईच्या कामांना गती देणे अपेक्षित होते. एप्रिल-मे असे दोन महिने प्रशासनाच्या हातात होते. विशेष म्हणजे, यावेळी सफाईच्या कामात हस्तक्षेप करायला पदाधिकारीही नव्हते. सर्वाधिकार प्रशासक म्हणून आयुक्त कविता द्विवेदी यांचे कडे असतानाही वेळेत शहरातील मॉन्सूनपूर्व सफाईची कामे प्रशासनाला करात आली नाही. शहरातील एकूण २४९ लहान-मोठ्या नाल्यांपैकी मे महिन्याच्या अखेरपर्यंत १२५ नाल्यांचीच सफाई होऊ शकली होती. त्याचे परिणाम शनिवारी सायंकाळी तासभर पडलेल्या पावसात दिसून आले.

शहराच्या सर्वच झोनमध्ये नाले तुंबल्याने अनेक मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शनिवारी रात्री उशिरापर्यंत अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. पाऊस थांबल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत घरापुढे नाल्याचे घाण पाणी वाहत असल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. रविवार मनपा प्रशासनाकडून सकाळपासूनच तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता सुरू करण्यात आली.

तापडियानगरमधील नाल्यात आवारभिंतीचा मलबा पडला होता. त्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावर आले होते. हे पाणी निघून जाण्यासाठी नाल्यातील मलबा सकाळीच जेसीबीच्या मदतीने काढण्यात आला असल्याची माहिती पूर्व झोनचे क्षेत्रिय अधिकारी विजय पारतवार यांनी दिली.

४५ मि.मी. पावसातच शहर जलमय

अकोला शहरात शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर तासभर मुसळाधर पाऊस कोसळला. या तासाभरातच शहरात दाणादाण उडाली. हवमाना खात्याने ४४.८ मिलीमीटर पावसाची नोंद केली. एवढ्या पावसातच शहरातील नाले तुंबले. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही स्थिती आहे. सलग पाऊस पडल्यास अकोला शहरातील नाल्यांमध्ये पाण्याचा निचरा करण्याची क्षमता नसल्याचे या पावसाने दाखवून दिले. त्यामुळे पावसाळ्यात महानगरपालिका प्रशासनासोबतच नागरिकांनाही यापेक्षा भयंकर स्थितीचा सामना करावा लागू शकतो.

या रस्त्यांवर साचले होते पाणी

शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे जुने शहरातील डाबकी राेड, गांधी चाैक, टिळक राेड, खुले नाट्यगृह चाैक, जैन मंदिर परिसर, दाना बाजार, काेठडी बाजार, मटका बाजार, ताजनापेठ परिसर, मुख्य पाेस्ट ऑफीस चाैक, धिंग्रा चाैक, टाॅवर चाैक ते एसीसी मैदानपर्यंतचा परिसर, रतनलाल प्लाॅट चाैक, जठारपेठ चाैक ते उमरी राेड, तापडियानगर परिसर, अकाेट फैल पाेलिस स्टेशनसमाेरचा परिसर, सिंधी कॅम्प आदी परिसरातील नाले तुंबल्यामुळे रस्त्यांनाच नाल्यांचे स्वरुप आले होते.

शहरातील झोननिहाय नाल्यांची संख्या

पूर्व झोन ः ८६ नाले

पश्चिम झोन ः ४६ नाले

उत्‍तर झोन ः ५९ नाले

दक्षिण झोन ः ५८ नाले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com