अकाेला : रिसोडमध्ये चिखलाचे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Municipal Council Risod damage roads

अकाेला : रिसोडमध्ये चिखलाचे साम्राज्य

रिसोड - जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसोड शहराची पार रया गेली आहे. चिखलात रस्ते की रस्त्यावर चिखल अशी परिस्थिती असताना येथील लोकप्रतिनिधींनी तोंडावर बोट ठेवले तर नगर परिषद प्रशासनाने डोळे मिटून घेतले आहेत. कोठे रस्ताकामाचा चिखल तर कोठे मुरूमाच्या नावावर टाकलेल्या मातीचा चिखल नागरिकांना दररोज चिखलस्नानाची पर्वणी घडवत आहेत.

स्थानिक छत्रपती शिवाजीमहाराज नगरमधील अंतर्गत रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. रिसोड नगर परिषद प्रशासन मागील दोन वर्षांपासून विकासकामांना खो देऊन निव्वळ चालढकल करण्याच्या धोरणाला कवटाळून बसले आहे. मागील १० वर्षात शहराच्या विस्तारात झपाट्याने वाढ झाली आहे.एकतानगर, शिवाजीनगर, हिंगोली रोड, मालेगाव रोड इत्यादी भागात नवनवीन वसाहती उभ्या राहत आहेत, परंतु रस्ते, पाणी, वीजपुरवठा या सोयीसुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत.

शिवाजीमहाराजनगरला लागून जिजाऊनगर आहे, तिथे गोरगरिब व श्रमिकांची वसाहत आहे, परंतु तो अतिक्रमित भाग असल्यामुळे ते नागरिकच नसल्यागत त्यांना वागणूक मिळत आहे. शिवाजीमहाराज वसाहत व जिजाऊनगर यांच्यामध्ये ६० फूट रुंदीचा रस्ता आहे परंतु त्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असून त्यावर डागडुजी करण्याची साधी आवश्यकताही प्रशासनाला वाटत नाही. नगर सेवक व संबंधित विभागाचे विकासकामे करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून प्रचंड राजकीय उदासीनता दिसून येत आहे.

पावसाळ्यात शिवाजीमहाराजनगरमधील नागरिकांना रस्त्याअभावी हाल सोसावे लागले आहेत. आता रस्त्यावर पडलेले खड्डे व असमतल पृष्ठभाग यामुळे दुचाकी चालविणे किंवा साधे चालणेही कठीण झाले आहे. नगर परिषद प्रशासन रस्त्याची झालेली दुर्दशा लक्षात घेऊन रस्त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊन कामे करावी, अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवाजीनगरमधील अंतर्गत रस्ते अतिशय खराब झाले असून लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवाजीमहाराजनगर येथील रहिवासी विशाल पाटील खडसे यांनी केली आहे.

बकाल व्यवस्थेला जबाबदार कोण?

शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिग आहेत. भाजीबाजारात नाक मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. पालिका प्रशासन उंटावरून शेळ्या हाकत असताना लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नावर तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. पावसाळा सुरू होण्याआधीच पालिकेने चिखलमय जागा मुरूमाने भरणे आवश्यक असताना अशी कोणतीच उपाययोजना न केल्याने रिसोड शहर चिखलात गेले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पालिकेच्या मानसिकतेचे वस्त्रहरण झाले आहे. या बाबीला प्रशासन व मुके लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचा आरोप जनतेमधून केला जात आहे.

Web Title: Akola Municipal Council Risod Bad Roads Damage Mud Construction Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top