esakal | १०३ वर्षांपासून शकुंतला रेल्वेचा लोहमार्ग इंग्रजांकडेच; कधी तुटणार गुलामीच्या बेड्या?

बोलून बातमी शोधा

akola news For 103 years, the railway line of Shakuntala has been with the British

देशाला इंग्रज राजवटीतून स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. अजूनही या देशात इंग्रजांचा हुकूम चालत असेल हे सांगूनही खरे वाटणार नाही. मात्र, तत्कालीन वऱ्हाड प्रातांची शान असलेली शकुंतला रेल्वे मात्र, अजूनही इंग्रजांच्याच ताब्यात आहे.

१०३ वर्षांपासून शकुंतला रेल्वेचा लोहमार्ग इंग्रजांकडेच; कधी तुटणार गुलामीच्या बेड्या?
sakal_logo
By
राम चौधरी

वाशीम  ः देशाला इंग्रज राजवटीतून स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. अजूनही या देशात इंग्रजांचा हुकूम चालत असेल हे सांगूनही खरे वाटणार नाही. मात्र, तत्कालीन वऱ्हाड प्रातांची शान असलेली शकुंतला रेल्वे मात्र, अजूनही इंग्रजांच्याच ताब्यात आहे. कधीकाळी पांढऱ्या सोन्याची राणी म्हणून ओळख असलेला हा लोहमार्ग आता भंगारात गेला असून, या गरीबरथाचा कायापालट करण्याचे साकडे खासदार भावना गवळी यांनी रेल्वेमंत्र्यांना घातले आहे. ‘वन टाईम सेटलमेंट’ नुसार हा व्यवहार होणार असून शकुंतलेच्या पायातील गुलामीच्या बेड्या निखळण्याची आशा निर्माण झाली आहे.


विदर्भातील पांढरे सोने वाहून नेण्याकरिता ब्रिटीश शासनाने सन १९१३ साली यवतमाळ ते मूर्तिजापूर रेल्वेची निर्मिती केली होती. ‘गरीबांचा रथ’ म्हणून ओळख असलेल्या या रेल्वे गाडीला ‘शकुंतला’ नाव मिळाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाले, मात्र या रेल्वेमार्गाची मालकी इंग्लंडच्या ‘निक्सन अ‍ॅण्ड निक्सन’ कंपनीकडेच राहली. प्रचंड दुरवस्था झाल्याने ही रेल्वे बंद केली गेली.

img


या रेल्वेमार्गाचे मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे याकरिता रेल्वेमंत्र्यांकडे खासदार भावना गवळी यांनी सन २००६-२००७ पासून मागणी लावून धरली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे यवतमाळपासून मध्य रेल्वे मार्गावरील मूर्तिजापूरला जोडणाऱ्या ११३ किलोमीटर अंतर असलेल्या या रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाकरिता तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २१४७.४४ कोटी मंजूर केले होते.

img

सन १९१३ पासून आजही ब्रिटीशांच्या ‘निक्सन’ कंपनीची मालकी ‘शकुंतला’ रेल्वे गाडीवर असल्यामुळे अडचणी निर्माण होत गेल्या. खासदार भावना गवळी यांनी रेल्वे मंत्र्यांना व रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना वारंवार भेटून शकुंतलेची इंग्रजांची ब्रिटीश कंपनीची असलेली मालकी काढण्याकरिता पाठपुरावा केला होता.


खासदार भावना गवळी यांनी नुकतीच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन ‘निक्सन’ कंपनीच्या मागणीचा एकत्रित तोडगा काढून शकुंतलेचा प्रश्‍न निकाली काढण्याची मागणी रेटून धरली होती. रेल्वे मंत्रालयाने यावेळी २१४७.४४ कोटी रुपयांची तरतूद केलेल्या या रेल्वे ब्रॉडगेजला कुठलीही जमीन संपादन करण्याची गरज नसल्याने ‘निक्सन’ कंपनीची मालकी या मार्गावरून काढण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)