झेंडूची फुले झाली सोन्याची, उच्च शिक्षित तरूणानं अशी केली लाखोंची कमाई

Akola News: Bhar Jahagirs Ashtagandha Marigold Flowers in Dadar Market
Akola News: Bhar Jahagirs Ashtagandha Marigold Flowers in Dadar Market

रिसोड (जि.वाशीम) : लाॅकडाउनमुळे बहुतांश व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांची हतबलता वाढली. मात्र, तालुक्यातील भर जहागिर येथील विजय गजानन जायभाये या युवकाने बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण करून शेती व्यवसायाला प्राधान्य दिले आणि लाॅकडाउन दरम्यान अवघ्या तीन महिन्यात त्याने सव्वा लाखांचे अष्टगंधा झेंडू फुलाचे उत्पन्न काढले.

गावातील इतर तीन शेतकऱ्यांनी सुध्दा अशाच प्रकारचे उत्पन्न घेतल्याने कोरोना लाॅकडाउनच्या मंदीचे त्यांनी सोने केले आहे. आज घडीला भर जहागिरची झेंडू फुले मुंबई दादरच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत.

अल्प शेतीला शिक्षण व कल्पकतेची जोड लावल्यास व बाजारपेठेचा अभ्यास करून उत्पादन घेत शेती व्यवसाय नफ्यात येऊ शकतो, हे भर जहागिर येथील युवा शेतकरी विजय जायभाये याने झेंडू फुलशेतीच्या माध्यमातून दाखवून दिले. विजय पुणे येथे बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेत एमपीएससीचा अभ्यास करीत होता. परंतु पुणे येथे कोरोना विषाणूचा प्रभाव वेगाने वाढत असल्याने विजयला स्वगावी यावे लागले. गावामध्ये येताच त्याने थेट शेतीकडे लक्ष केंद्रित केले.

ऐन उन्हाळ्यातील मे महिन्यात कुठल्या पिकाची लागवड करावी याचा अभ्यास करीत त्याने पुणे, मुंबई सारख्या बाजारपेठेमध्ये आगामी सण-उत्सवांचा विचार केला आणि त्याच्यासह प्रकाश मुरकुटे, समाधान सानप, प्रकाश गरकळ यांनी प्रत्येकी तीस गुंठे शेतामध्ये अष्टगंधा झेंडू फुलांच्या रोपाची लावगड केली.

लाॅकडाउनच्या तीन महिन्यामध्ये येथील चार शेतकऱ्यांनी आतापर्यंत सहा वेळा झेंडू फुलांची तोडणी केली आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी जवळपास तीस क्विंटलपर्यंतचे उत्पन्न काढले आहे. यातून प्रत्येक शेतकऱ्याला सुमारे सव्वा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या फुलांची विक्री ही थेट शेतामधून चाळीस ते पन्नास रूपये प्रमाणे होत आहे.

या खरेदीसाठी मुंबई, दादर, पुणे येथील व्यापारी गाड्या भरत आहेत. हल्ली गणेश उत्सवासह विविध सणउत्सवाचे दिवस असल्याने झेंडू फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. आजघडीला मुंबई, दादर, पुणे येथील बाजार पेठेमध्ये २०० ते २५० रूपये किलो प्रमाणे झेंडू फुलांची किरकोळ विक्री होत आहे.

परंतु परिसरातील लाॅकडाउन परिस्थितीमध्ये सर्वत्र बंद असून, हा बंद पुढील किती दिवस चालणार या भितीपोटी अनेक शेतकऱ्यांनी झेंडू लागवडीकडे पाठ फिरवली. परंतु, विजय जायभाये या युवा शेतकऱ्याने लाॅकडाउनमधील मंदिचे चांदी करीत झेंडू फुलांच्या उत्पन्नामध्ये बाजी मारली. आज भर जहागिर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील झेंडू फुलांचा सुगंध मुंबई-दादरच्या बाजारपेठेत दरवळतोय हे विशेष.

लाॅकडाउनदरम्यान पुणे येथून घरी आलो. हा लाॅकडाउन कधीपर्यंत चालणार याची माहिती नव्हती. त्यामुळे शेतीकडे वळलो आणि बाजारपेठेचा अभ्यास करीत स्वतःसह गावातील तीन शेतकऱ्यांनी अष्टगंधा झेंडू फुलांची शेती करण्याचे ठरविले. आज भर जहागिर येथील शेतकऱ्यांची झेंडू फुले मुंबई-दादरच्या बाजारपेठेत विक्री होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
- विजय जायभाये, युवा शेतकरी, भर जहागिर
(संपादन - विवेक मेतकर)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com