बापरे... आकाशवाणी केंद्रावर अतिरेक्यांचा हल्ला!

भगवान वानखेडे
Friday, 28 August 2020

गणेशोत्सवाच्या आणि मोहोरमच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिस दलाने गुरुवारी (ता.२७) दुपारच्या सुमारास सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यासमोरील आकाशवाणी केंद्रात मॉकड्रील आयोजित केली होती. या रंगीत तालमीमध्ये दहशतवाद विरोधी पथक सहभागी झाले होते.

अकोला : गणेशोत्सवाच्या आणि मोहोरमच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिस दलाने गुरुवारी (ता.२७) दुपारच्या सुमारास सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यासमोरील आकाशवाणी केंद्रात मॉकड्रील आयोजित केली होती. या रंगीत तालमीमध्ये दहशतवाद विरोधी पथक सहभागी झाले होते.

अकोला आकाशवाणी केंद्रात अतिरेकी घुसले आहेत. या अतिरेकांनी संपूर्ण आकाशवाणी केंद्र हॉयजॅक केले असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाकडून स्थानिक पोलिस स्टेशन, अग्निशमन दल, रुग्णवाहिका,  शिघ्र कृतीदल, बॉम्ब शोधक व नाशक पथकास ही माहिती देण्यात आली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

काही वेळातच पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, एसडीपीओ सचिन कदम, पोलिस स्टेशनचे अधिकारी व इतर यंत्रणा आकाशवाणी केंद्रा समोर हजर झाली. अतिरेकी असलेल्या आकाशवाणीचा परिसर पोलिसांनी दोरी लावून निर्मनुष्य केला.

संपूर्ण घटना पाहताना परिसरातील समस्त नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. त्यातच पोलिसांनी पोजिशन घेत हल्ला सुरू केला. एक-एक करीत आत शिरलेल्या अतिरेक्यांना ठार करण्यात आले. हा सर्वप्रकार होईपर्यंत परिसरात असलेल्या नागरिकांना काहीच समजेनासे झाले.

मॉकड्रील पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून नागरिकांना मॉकड्रील असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तब्बल अर्धातास ही मॉकड्रील सुरू होती.

अकोला पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला जिल्ह्यात कुठे दहशतवादी हल्ला झाला तर अकोला पोलिस या हल्याला चोख उत्तर देण्यास सक्षम आहे किंवा नाही, याची चाचपणी यातून केली.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Color Training of Anti-Terrorism Squad