esakal | येणारी अमावस्या कापूस उत्पादकांना भारी!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News Coming New Moon heavy for cotton growers!

अमावस्येच्या रात्री बोंडअळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने, कापूस उत्पादकांना ही अमावस्या चिंतेची ठरणार आहे. हा अंधश्रद्धेचा भाग नसून, पतंगांनी घातलेल्या अंड्यांमधून घनदाट अंधारात बोंडअळीच्या अळ्या बाहेर पडतात.

येणारी अमावस्या कापूस उत्पादकांना भारी!

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला : अमावस्येच्या रात्री बोंडअळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने, कापूस उत्पादकांना ही अमावस्या चिंतेची ठरणार आहे. हा अंधश्रद्धेचा भाग नसून, पतंगांनी घातलेल्या अंड्यांमधून घनदाट अंधारात बोंडअळीच्या अळ्या बाहेर पडतात.

१७ सप्टेंबरच्या भाद्रपद सर्वपित्री अमावस्येला घनदाट अंधार राहणार असल्याने, कृषी तज्ज्ञांनी या अमावस्येनंतर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सन २०१७-१८ मध्ये वऱ्हाडात शंभर टक्के कापूस पीक क्षेत्रावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, जवळपास निम्मे उत्पादन नुकसानात गेले होते. त्यामुळे कृषी विभाग व कृषी विद्यापीठाद्वारे गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आढावा बैठकी झाल्या, संशोधनं झाले.

गेल्या दोन वर्षात वऱ्हाडात केवळ ५ ते १० टक्के गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले. मात्र ‘घनदाट अंधार’ गुलाबी बोंडअळीच्या पतंगाने घातलेल्या अंड्यांमधून अळ्या बाहेर पडण्याचा काळ असल्याचे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

१७ सप्टेंबरच्या भाद्रपद/सर्वपित्री अमावस्येच्या रात्री घनदाट अंधार राहतो. त्यामुळे या अमावस्येनंतर गुलाबी बोंडअळीची संख्या वाढून प्रादुर्भाव अधिक राहण्याची शक्यता आहे.

कामगंध सापळ्यांमधील ‘ल्यूर’ बदलावे
गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतात कामगंध सापळे लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पतंगांना आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळ्यात लावलेल्या ल्यूरची मुदत ४५ दिवसांचीच असल्याने, अधिक प्रभावी नियंत्रणासाठी ४५ दिवसानंतर ते बदलून दुसरे लावण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास
गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी (५ टक्के प्रादुर्भाव) गाठल्यास, थायोडीकार्ब ७५ टक्के २० ग्रॅम किंवा इंडोक्साकार्ब १५.८ टक्के १० मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के १० मिली, दहा लीटर पाण्यात मिसळून फवारावे. दुसऱ्या फवारणीची आवश्यकता भासल्यास, प्रोफेनोफॉस ४० टक्के+सापरमेथ्रीन ४ टक्के २० मिली किंवा क्लोरेंट्रॅनीलीप्रोल ९.३ टक्के+लँब्डासायहॅलोथ्रीन ४.६ टक्के, ५ मिली किंवा डेल्टामेथ्रीन १ टक्का+ट्रायझोफॉस ३५ टक्के १० ते १२ मिली दहा लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

अमावस्येनंतर बहुतांश भागातील कपाशी ९० हून अधिक दिवसाची होत आहे. अमावस्येच्या रात्री अंडी घालण्याचे प्रमाण अधिक राहून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी १७ सप्टेंबरच्या दहा दिवस आधी व दहा दिवस नंतर निंबोळी अर्काची फवारणी, फेरोमन ट्रॅप, टायकोडर्मा कार्डद्वारे चोख व्यवस्थापन करावे, जेणेकरून प्रादुर्भाव टाळता येईल.
- डॉ. ए.के. सदावर्ते, मुख्य पीक संरक्षण अधिकारी, कीटकशास्त्र विभाग, डॉ.पंदेकृवि अकोला
(संपादन - विवेक मेतकर)

loading image