अकोटमध्ये व्यापारी रस्त्यावर; पोलिस स्टेशनसमोर ठिय्या

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 7 April 2021

‘ब्रेक दी चेन’ नुसार राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले, ज्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले. या आदेशाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी अकोटातील व्यापारी वर्गाने रस्त्यावर उतरून अकोट शहर पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करीत आपला संताप व्यक्त केला.
 

 

अकोट (जि.अकोला) : ‘ब्रेक दी चेन’ नुसार राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले, ज्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले. या आदेशाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी अकोटातील व्यापारी वर्गाने रस्त्यावर उतरून अकोट शहर पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करीत आपला संताप व्यक्त केला.

अकोट शहरात मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरत अनेक व्यापारी राज्य सरकार व प्रशासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली. यावेळी अनेक व्यापारी वर्गाने गर्दी करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही केली आहे.

कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आक्रमक झाले असून, कठोर पावले उचलत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात दिवसा जमाबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानांना व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी नाकारली आहे. याचा निषेध म्हणून अकोट शहरातील व्यापारी रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत शहर पोलीस स्टेशन समोर ठिया आंदोलन करीत आपला संताप व्यक्त केला. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक संतोष महल्ले यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढल्याने व्यापाऱ्यांनी निवेदन देऊन आपले आंदोलन मागे घेतले.

निवेदनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार अकोट शहरात हे तिसरे लॉकडाउन असून, शहरात परिस्थिती नियंत्रणात आहे. रुग्ण वाढीचा दर हा पूर्वी पेक्षा कमी आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या प्रत्येक नियमाचे व्यापारी वर्गाने पालन केले आहे. आम्ही आरटी-पीसीआर चाचणी करूनच दुकाने सुरू केली. कोविड नियमावलीचे ही काटेकोर पालन करीत असतो. व्यवसाय आता कुठं व्यवस्थित सुरू होत असताना पुन्हा निर्बंध लावित लॉकडाउन करणे आम्हाला परवडणार नाही, २५ दिवस व्यवसाय बंद ठेवल्याने या व्यवसायावर जवळपास पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी प्रशासनाने या गोष्टीचा पुनर्विचार करून सर्व व्यापाऱ्यांना सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
....................
‘मागील वर्षी हा आजार नवीन होता. आरोग्य यंत्रणा सज्ज नव्हती. त्यामुळे लॉकडाउन निर्णय योग्य होता. त्यावेळी बंदमुळे मोठे नुकसान झाले होते; मात्र आता प्रशासनाच्या दाव्या नुसार आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. आजारासोबत एक वर्षाची लढाई आपण लढलो आहोत. त्यामुळे आता बंद करण्याऐवजी काही निर्बंध लावून व्यापार सुरू ठेवायला पाहिजे.
-सचिन भुस्कट, कापड व्यवसायिक.
.......................
लॉकडाउनमुळे डोके बंद पडले आहेत साहेब. धंदे आमचे आणि कुलूप प्रशासनाचे अशी गत झाली आहे. केव्हा कुठला आदेश येईल सांगता येत नाही. वरून त्यातला चंचलपणा तर कोरोना विषाणू पेक्षा अधिक गतिमान झालेला आहे.
- सुदाम राजदे, व्यावसायिक.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news On a commercial street in Akot; Sit in front of the police station