esakal | ना लग्नाचा थाटमाट, ना मृत्यूनंतरचे कर्मकांड
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Corona causes a change in lifestyle as well as stereotypes

संपूर्ण जगासह देशाला विळख्यात घेतलेल्या कोरोना विषाणूने देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आणत मानवाची जीवनशैलीच बदलून टाकली आहे. मोठ्या थाटामाटात होणारे विवाह सोहळे मोजक्यांच्याच उपस्थित होऊ लागले. एवढेच नव्हे, तर मृत्यूनंतरचे कर्मकांडही करता येत नसल्याने कोरोनाने थेट रूढी-परंपरेलाही छेद दिला आहे. डोळ्याने न दिसणाऱ्या एका विषाणूने घडवलेला बदल आता प्रत्येकाच्या अंगवळणी पडत आहे.

ना लग्नाचा थाटमाट, ना मृत्यूनंतरचे कर्मकांड

sakal_logo
By
विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा)  : संपूर्ण जगासह देशाला विळख्यात घेतलेल्या कोरोना विषाणूने देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आणत मानवाची जीवनशैलीच बदलून टाकली आहे. मोठ्या थाटामाटात होणारे विवाह सोहळे मोजक्यांच्याच उपस्थित होऊ लागले. एवढेच नव्हे, तर मृत्यूनंतरचे कर्मकांडही करता येत नसल्याने कोरोनाने थेट रूढी-परंपरेलाही छेद दिला आहे. डोळ्याने न दिसणाऱ्या एका विषाणूने घडवलेला बदल आता प्रत्येकाच्या अंगवळणी पडत आहे.


सहा महिन्यांपूर्वी देशात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूने ऐतिहासिक बदल करीत सुरळीत चाललेल्या माणसाच्या आयुष्यालाही मोठे वळण दिले आहे. कोरोनाचा होणारा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत असल्याने उपाययोजना करताना शासनाच्या नाकीनऊ येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा मुख्य पर्याय असल्याने गर्दी टाळण्यासाठी इतिहासात पहिल्यांदा बस, रेल्वे, विमानाची चाके थांबली आहेत. मोठमोठे उत्सव, सण, विवाहसोहळे शासनाला रद्द करावे लागल्याने नेहमीच गर्दीत हरवून गेलेला माणूस सहा महिन्यांपासून एकाकी पडल्याचे जाणवत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

प्रत्येक धर्मातील अतिमहत्त्वाचे सण, सार्वजनिक उत्सव घरीच साजरे होताहेत. हजारोंच्या उपस्थितीत होणाऱ्या लग्नसोहळ्यांना बोटावर मोजता येतील एवढ्यांचीच उपस्थिती पाहायला मिळतेय. यामुळे खर्चाची बचत होत असली तरी यावर अवलंबून असलेल्या मंडप, साउंड, केटरिंग, फोटोग्राफर, आचारी, ब्युटीपार्लर, डीजे यांसारख्या व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय. हॉटेलच्या चटकदार जेवणाची चव आता घरच्या भाज्यांवरच भागवावी लागतेय, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी जिवलगांचे आलिंगनही विस्मरणात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे, तर अनेक धर्मांत पिढ्यानपिढ्या चालत आलेले मृत्यूनंतरचे कर्मकांडही कोरोनामुळे बंद झाले आहे. ना पिंडदान, ना दशक्रिया विधी, ना तेरवा, ना वर्षश्राद्ध. यामुळे थेट परंपरेलाच छेद बसत असल्याने नागरिकांचाही नाइलाज झाला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)