डॉक्टर, आता कुठे गेला तुमचा धर्म अन् घेतलेली शपथ!

प्रा.अविनाश बेलाडकर 
Wednesday, 23 September 2020

आता कुठे गेला तुमचा धर्म?, असा सडेतोड प्रश्न वैद्यकीय सेवाव्रत स्विकारण्यापूर्वी घेतलेली शपथ विसरणाऱ्या व कोरोनाच्या संकटकाळात संकुचित वृत्ती धारण करणाऱ्या असंख्य खासगी डॉक्टरांना विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे कटू प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्ते सतिश आग्रवाल यांनी केले.

मूर्तिजापूर, (जि.अकोला) : आता कुठे गेला तुमचा धर्म?, असा सडेतोड प्रश्न वैद्यकीय सेवाव्रत स्विकारण्यापूर्वी घेतलेली शपथ विसरणाऱ्या व कोरोनाच्या संकटकाळात संकुचित वृत्ती धारण करणाऱ्या असंख्य खासगी डॉक्टरांना विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे कटू प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्ते सतिश आग्रवाल यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही पत्रकारांशी वार्तालाप करतांना त्यांनी ही खंत व्यक्त केली. ते म्हणाले, वैद्यकीय सेवाव्रत स्वीकारण्यापूर्वी सर्व डॉक्टर, हे परमेश्वरा, माझ्या हाताला कौशल्य दे. मनाला निकोप दृष्टी दे. हृदयाला दया, प्रेम आणि सहानुभूति व त्यागभावना दे, अशी शपथ घेतात. शासकीय सेवेतील डॉक्टर आणि खासगी प्रॕक्टीस करणारे काही डॉक्टर या शपथेचे व रुग्णसेवा या आपल्या धर्माचे पालक करीत आहेत. त्यांची भूमिका नक्कीच प्रशंसनीय आहे, परंतु कोरोनाचे संकट अतिशय गडद होत असतांना ही शपथ व आपला धर्म विसरणारी काही डॉक्टरांची वृत्ती खेदजनक आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अशा संकटसमयी आपली रुग्णालये कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देणे, तर दूर काही धंदेवाई डॉक्टर मंडळी लाखो रुपयांनी रुग्णांची लूट करीत आहेत. बेड उपलब्ध होत नाहीत म्हणून प्राण सोडणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत असूनही त्यांच्या हृदयाला पाझर फूटत नसल्याबद्दल संताप व्यक्त करून अशा डॉक्टरांची रूग्णालये कायद्याने अधिग्रहीत करण्याची वेळ येऊन ठेपल्याचेही ते म्हणाले.

राज्य शासनाने असा अध्यादेश काढून कोरोनाचे संकट संपुष्टात येईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना तसे अधिकार प्रदान करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

तसेच अशा संकटकाळात कोणत्याही रुग्णाला आपल्या रुग्णालयात प्रवेश नाकारणाऱ्या डॉक्टरांना रुग्णाची किमान प्राथमिक तपासणी करण्याबाबत सूचित केल्या जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Demand for acquisition of private hospitals till Corona is deported