Video: सत्ताधारी-विरोधी पक्ष सदस्यांमध्ये ‘तूतू-मैमै’, सभेत गदारोळ, बॉयकॉट अन् एकांगी चर्चा!

मनोज भिवगडे
Friday, 30 October 2020

महानगरपालिकेच्या गुरुवारी (ता. २९) झालेल्या सर्वसाधारण सभेतही गदारोळ झाला. मागिल सभेत वेळेवर आलेल्या विषयांचे वाचन करणे व इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयावरून झालेल्या गदारोळातच सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यातून शिवसेनेच्या नगरसेवकाला दोन सभांसाठी निलंबित करण्यात आले.

अकोला : महानगरपालिकेच्या गुरुवारी (ता. २९) झालेल्या सर्वसाधारण सभेतही गदारोळ झाला. मागिल सभेत वेळेवर आलेल्या विषयांचे वाचन करणे व इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयावरून झालेल्या गदारोळातच सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यातून शिवसेनेच्या नगरसेवकाला दोन सभांसाठी निलंबित करण्यात आले.

त्यानंतर ५० कोटीच्या विकास कामांचे नियोजनासाठी निधीच्या विषयावर चर्चा करण्याच्या मुद्यावरून गदारोळ सुरूच राहिला. परिणामी काँग्रेस व शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएम सदस्यांच्या उपस्थितीत सत्ताधारी भाजपने सभेत विषय सूचिवरील विषय चर्चा करून मंजूर केले व वेळेवरच्या विषयांनाही महापौर अर्चना मसने यांनी मंजुरी दिली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मनपाची सर्वसाधारण सभा गुरुवारी मनपा आवारातील मोकळ्या जागेत मंडप टाकून घेण्यात आली. या सभेत ता. २ जुलै व ३० सप्टेंबर रोजी आयोजित सभेतील विषय व इतिवृत्तांवर चर्चा करून मंजूर करण्याच्या विषयापासूनच गदारोळाला सुरुवात झाली. महापौरांनी सभा सुरू करण्याची सूचना केल्यानंतर सत्ताधारी भाजपचे नगरसेवक विनोद मापारी यांनी ३० सप्टेंबरच्या सभेतील २ ते ७ क्रमांकाच्या विषयांचे वाचन करण्यास सुरुवात केली.

त्याला शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी आक्षेप घेतला. सभेच्या विषयांची सूची नगरसचिवांनी किंवा महापौरांनी वाचावी असा त्यांचा आग्रह होता. मात्र महापौरांनी चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांच्या आग्रहानुसार व त्यांनी दिलेल्या पत्रानुसारच विषय सभेच्या विषय सूचिवर घेतल्याचे सांगितले. त्यावर विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी यापूर्वीच्या सभेत मंजूर विषय पुन्हा चर्चेला घेता येतात काय, याचे स्पष्टीकरण करण्यास सांगितले.

त्यानंतर नगरसेवक मापारी यांनी विषय वाचणे बंद केले व महापौरांनी ३० सप्टेंबरच्या सभेतील २ ते ७ या विषयांवर मतदान घेण्याची सूचना केली. त्यानुसार विषय मंजुरीसाठी ४४ सदस्यांनी हात वर करून मतदान दिले. विरोधात एकही मतदान झाले नाही तर तीन सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे हा विषय बहुमताने मंजूर केला. त्यानंतर विषय सूचिवरील विषय महापौरांनी वाचन करीत मंजुरी देण्यास सुरुवात केली.

दरम्यान, विरोध पक्ष सदस्य चर्चेची मागणी करीत सभागृहात गदारोळ करीत होते. विषय सूचिवरील सहाव्या क्रमांकाच्या विषयावर विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी चर्चा करावयाची असल्याचे सांगून विकास कामांसाठी ५० कोटी कोठून आणणार याबाबत स्पष्टीकरण मागितले. त्यापूर्वीच भाजपचे गटनेते राहुल देशमुख यांनी महापौरांना या विषयावर निर्णय घेण्याचे सर्वाधिक सभागृह देत असल्याचे सांगितले.

त्यांच्या सांगण्यावरून हा विषय मंजूर करण्यात आला व पुढील विषय वाचण्यास सुरुवात केली. त्यामुळे विरोध पक्ष काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएमचे सदस्य सभागृहात बसून होते. त्यांच्या उपस्थितीत सर्व विषयांवर व वेळेवरच्या विषयांवर चर्चा करून रुग्णवाहिकेचा विषय स्थगित ठेवत इतर सर्व विषय मंजूर करण्यात आले.

शिवसेनेचे नगरसेवक निलंबित
सभागृहात गदारोळ सुरू असताना शिवसेनेचे नगरसेवक शशिकांत चोपडे यांनी सभामंडपाचा खांब ओढून मंडप पाडण्याचा प्रयत्न केला. त्याला विजय अग्रवाल व शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी वेळीच धाव घेवून थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांच्या या कृतीमुळे महापौरा अर्चना मसने यांनी नगरसेवक चोपडे यांना पुढील दोन सर्वसाधारण सभांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश दिला.

डायस फेकला, माईकही तोडला
सत्ताधारी भाजपकडून चर्चेसाठी वेळ दिला जात नसल्याचा आरोप करून सभागृहात गदारोळ घालणारे शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी नगरसचिवांच्या पायापडून त्यांना सभागृह नियमानुसार चालविण्याची विनंती केली. याच गदारोळात त्यांनी सभागृहातील डायस फेकला आणि हातातील माईक खाली फेकून तोडला.

सभापती-गटनेत्यांमध्ये शाब्दीक चकमक
सभागृहात सुरू असलेल्या गदारोळात स्थायी समिती सभापती सतिश ढगे यांनी विरोधी पक्ष सदस्यांच्या कृतीवर आक्षेप घेतला. एकदा मंजूर झालेल्या विषयावरही चर्चेचा आग्रह का पडकला जात आहे, अशी विचरणा त्यानी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांना केली. त्यावरून दोघांमध्ये सभागृहातच शाब्दीक चकमक झाली. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र इतर सदस्यांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

काँग्रेस सदस्यांमध्येच मतभेद
सभागृहात गदारोळ सुरू असताना विरोध पक्ष सदस्यांनी सभात्याग करण्याचा इशारा दिला. या निर्णयावर काँग्रेस सदस्यांमध्येच मतभेद दिसून आलेत. काँग्रेसचे नगरसेवक नैशाद यांनी सर्वजण आपल्या मतदारसंघातील कामे करून घेतात. सभेत चर्चा होऊ देत नाही. सदस्यांना त्यांची मत मांडू दिली जात नाही. कामे मंजूर न करता सभात्याग का करता, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे विरोध पक्ष नेत्यांनाही नमते घ्यावे लागले. त्यानंतर विरोध पक्ष नेत्यांनी त्यांच्या दालनात या सदस्याचे चांगलेच कान उपटले.

विरोधी पक्ष करणार तक्रार
अकोला महानगरपालिकेत गुरुवारी झालेल्या सभेसह यापूर्वीच्या दोन सभा नियमबाह्यरित्या चालविल्याबाबत राज्य शासनाकडे तक्रार करून महापौरांना अपात्र करण्याची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण व शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी सभेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सभागृहात सर्वांना चर्चेसाठी पुरेशा वेळ देण्यात येत आहे. चर्चा करण्याऐवजी गदारोळ करण्यात येतो. विरोध पक्ष सदस्यांचे हे नेहमीचेच झाले आहे.
- अर्चना मसने, महापौर

शहराच्या विकासबाबत काही देणेघेणे नसलेले सदस्य सभागृहात गदारोळ घालतात. त्यांना शहरातील नागरिकांशी कवडीचेही घेणेदेणे नाही. सर्वसामान्य नगरसेवकांंच्या हक्कावर गदा आणण्याचे काम विरोध पक्ष सदस्य करीत आहेत.
- विजय अग्रवाल, माजी महापौर

सभागृहात झालेले काम पूर्णपणे बेकायदेशीर आहे. चर्चा करण्यात आली नाही. सर्वसामान्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सत्ताधारी अडचणी आणत आहेत. त्यामुळे सभागृहात चर्चा नाकारली जाते. याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे दाद मागू.
-राजेश मिश्रा, गटनेते, शिवसेना

सभागृहात विरोधी पक्ष सदस्यांना बोलू दिले जात नाही. चर्चा केली जात नाही. त्यामुळे सभा बोलावताच कशाला? शहरासाठी विकास कामांबाबत बोलतान, त्यासाठी निधी कोठून आणणार याबाबत खुलासा का करीत नाही? लोकशाही मार्गाने सभागृह चालविल्या जात नाही. दादागिरी करूनच सभेचे कामकाज केले जाते. आता सभागृहात दादागिरी काय असते, हे विरोधी पक्ष नेता म्हणून मी दाखवून देईल.
- साजिद खान पठाण, विरोधी पक्ष नेते, मनपा

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Disputes among ruling-opposition party members, riots in the assembly, boycott and one-on-one discussion!