पुरे झाला लॉकडाउन!, व्यापाऱ्यांचा संयम सुटला; जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले आदेश रद्द करा

मनोज भिवगडे
Friday, 31 July 2020

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू असलेला लॉकडाउन आणखी वाढवू नका. सर्व नियम पाळू, पण दररोज दुकाने उघडण्याची परवानगी द्या. यापूर्वीचा आदेश रद्द करा अशी विनंती व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अकोला  ः मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू असलेला लॉकडाउन आणखी वाढवू नका. सर्व नियम पाळू, पण दररोज दुकाने उघडण्याची परवानगी द्या. यापूर्वीचा आदेश रद्द करा अशी विनंती व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी 24 मार्च 2020 पासून सलग चार महिने लॉकडाउन करण्यात आले. जीवनावश्‍यक वस्तू वगळता इतर व्यवसाय बंद होते. 1 जुलैपासून समविषम पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यामुळे व्यवसायात मोठा आर्थिक फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. एकीकडे कामगारांचे वेतन, इतर दैनंदिन खर्च, विजेचा खर्च आदी बाबींवर होणारा खर्च सुरूच आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मात्र व्यवसायच बंद असल्याने हा खर्च करायचा कसा, असा प्रश्‍न व्यापाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांचाही संयम सुटत असून, पुरे झाला लॉकडाउन, त्यात आणखी वाढ नको, अशी मागणी व्यापाऱ्यांनी जिल्हाप्रशासनाकडे केली आहे.

नियम पाळू, दुकाने उघडू द्या
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणू सर्व नियम पाळून व्यवसाय करण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे. पण दररोज दुकाने उघडण्याची परवानगी द्या, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करणयात आली आहे. लॉकडाउनमुळे सर्वच घडक अडचणीत आले आहे. त्यातच येणारा काळ हा सणासुदीचा असल्याने व्यवसायाचा काळ आहे. त्यामुळे दररोज दुकाने उघडी ठेवल्यास व्यवसाय करणे शक्‍य होणार आहे, अस व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
आता यापुढे लॉकडाउन करू नका. अकोला शहरातील व्यापाऱ्यांनी या मागणीचे निवेदन गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 2 ऑगस्ट 2020 नंतर लॉकडाउन येऊ नये. व्यापारी,कामगार व ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने दररोज दुकाने उघडण्याची परवानगी निवेदनातून मागण्यात आली आहे.
 
वंचितचा पाठिंबा
राज्यासह देशात सुरू असलेला लॉकडाउन आणखी वाढवू नये. अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील व त्यांच्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावर येऊ, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. त्यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीलाही पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी व्यापारी प्रतिनिधी मनोहर पंजवानी, ऍड.संतोष रहाटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड आदींच्या उपस्थितीत अकोला शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून आणखी लॉकडाउन न वाढविण्याची विनंती केली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Enough Lockdown !, Traders lose patience; The Collector was told to cancel the order