नांदुरा येथील प्रसिद्ध खव्याला कोरोनाचे ग्रहण, लॉकडाऊन व संक्रमणाच्या भीतीने खवा व्यवसायावर अवकळा

akola news Famous khawya in Nandura has been affected by the corona eclipse, lockdown and infection.
akola news Famous khawya in Nandura has been affected by the corona eclipse, lockdown and infection.

नांदुरा (जि.बुलडाणा)  ः नांदुरा तालुक्‍यातील प्रसिद्ध खवा व्यवसायालाही कोरोना रोगाने सध्या गिळंकृत केल्याचे चित्र आहे. 4 महिन्यापासून सुरू असलेले सततचे लॉकडाउन व नांदुरा शहरात वाढत असलेले कोरोना रुग्ण यामुळे बाहेर गावचे खवा खरेदीदार फिरकूनच पाहत नसल्याने खवा व्यावसाय चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे खव्याच्या दरात तर लक्षणीय घट झाली असून 70 रुपये प्रति किलो याप्रमाणे काही खरेदीदार हा खवा पोच विकत मागून एकप्रकारे खवा व्यावसायिकांची थट्टा करत असल्याने अनेकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.


नांदुरा येथील खवा हा संपूर्ण महाराष्ट्रात गुणवत्तेमुळे वेगळी ओळख निर्माण करून महाराष्ट्रातील सर्व महानगरात व आसपासच्या राज्यात नावारूपास आलेला आहे. तालुक्‍यातील जवळपास अनेक कुटुंबांचा हा पारंपरिक व्यवसाय असून, रेल्वे मार्गाने हा खवा सगळीकडे आतापर्यंत पोहचत आला आहे. त्यासाठी रेल्वे चौक येथे मोठी खव्याची बाजारपेठ भरत आली असून, खवा व्यावसायिक येथून मागणीनुसार खवा देशभरात हॉटेल व्यावसायिकांना व ग्राहकांना पुरवत असल्याने रोज लाखो रुपयांची उलाढाल यामाध्यमातून होत आली आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सततचा लॉकडाउन सुरू असून, बस व रेल्वे सेवा विस्कळीत होत गेल्याने या व्यवसायावर सद्या उभे संकट ठाकले आहे. त्यामुळे जोडधंदा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकरी व खवा व्यावसायिक या दोघांवरही त्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नांदुरा शहरातही कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने भीती पोटी किंवा लॉकडाउनमुळे येण्या जाण्याचे वांदे असल्याने खव्याची मागणी ही प्रचंड घटली आहे. दुसरीकडे लॉकडाउनमुळे रेल्वे सेवा व बस सेवाही उपलब्ध राहत नसल्याचा परिणाम म्हणून काही व्यावसायिक पोच म्हणून फक्त 70 रुपये किलोने जागेवरच खवा मागणी करत असल्याने अनेक व्यावसायिकांनी सद्या या व्यवसायाला बंद स्थितीत लॉकडाउन केल्याचे चित्र आहे.

खवा बनविणे ते विक्री पर्यंतचा प्रवासही अडचणींचा
खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या घरापर्यंत मोटारसायकल किंवा ऑटोद्वारे पोहचत योग्य मोबदल्यातून शेतकऱ्यांचे दूध खरेदी केल्यानंतर दुपारी भट्टी पेटवत दुधाला घोटवून खवा तयार तयार केला जातो. नंतर कागदात प्रति किलो वजनात पॅकिंग करून नांदुरा येथील मार्केटमध्ये हा खवा विक्रीला नेला जातो. तेथे दूरदूरवरून आलेले व्यापारी हराशीतून हा खवा खरेदी करत असून, मागणीनुसार याची विल्हेवाट लावत आले आहेत. परंतु सद्या लॉकडाउनमुळे हा व्यवहार पूर्णतः ठप्प झाला आहे.

दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत
सध्या जीवनावश्‍यक वस्तूमध्ये मोडणाऱ्या दुधाला विक्रीसाठी मोकळीक असली तरी सगकीकडेच दुधाची मागणी घटली असल्याने खव्याला दूध देणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध घेण्यास डेअरी व्यावसायिक मागेपुढे पाहत आहे.सध्या पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असल्याने घरीच पडून असणारे हे दूध अंगावर पडत असल्याने व दुधाला अल्प दर मिळत असल्याने अगोदरच अडचणीत आलेला शेतकरी यामुळे संकटात सापडला आहे

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com