Video :आजपासून पाच दिवस जनता कर्फ्यू, अकोलेकर कन्फ्युज

मनोज भिवगडे
Friday, 25 September 2020

कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेशी तयारी दिसत नाही. अशातच व्यापारी संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले.

अकोला : कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता विदर्भ चेंबर ऑफ कामर्स व इतर सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येत शुक्रवार, ता. २५ सप्टेंबरपासून पाच दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनानेही त्याला पाठिंबा दर्शविला आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनीही व्यापाऱ्यांच्या आवाहनाला जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र फुटपाथ व किरकोळ विक्रेत्यांसह विविध संघटनांचा या जनता कर्फ्यूला विरोध असल्याने सुरू होण्यापूर्वीच त्याचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे जनताही जनता कर्फ्यूबाबत संभ्रमात पडली आहे.

 

  • विदर्भ चेंबरच्या आवाहनाला अनेक संघटनांचा विरोध
  • नाभिक समजाचा सहभागी होण्यास विरोध
  • झुंज फुटपात संघटनाही विरोधात
  • किरकोळ साहित्य विक्रेतेही सहभागी होणार नाही
  • शासकीय कार्यालये, बँका सुरू, जतना संभ्रमात
  • प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून सहभागी होण्याचे आवाहन

कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेशी तयारी दिसत नाही. अशातच व्यापारी संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्याला प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे दर्शविण्यात आले. विदर्भ चेंबर ऑफ कार्मस या संघटनेने जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. मात्र आता त्यांच्या आवाहानाला प्रतिसाद मिळण्या ऐवजी सर्वच स्तरातून विरोध होत असल्याने जनता कर्फ्यूचा सुरू होण्यापूर्वीच फज्जा उडताना दिसत आहे.

तळ्यातमळ्यात' : उद्यापासून जनता कर्फ्यू | eSakal

फुटपाथ संघटना, नाभिक संघटना व किरकोळ विक्रेत्यांसह विविध संघटनांनी जनता कर्फ्यूला विरोध असल्याची निवेदने जिल्हा प्रशासनाला दिली आहेत. त्या झुंज फुटपपात संघटना, नाभिक समाज दुकानदार संघटना, श्रीराम सेनाचे ॲड. पप्पू मोरवाल आदींसह विविध संघटनांचा समावेश आहे. भाजिपाला विक्रेतेही जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्यास तयार नसल्याची माहिती आहे.

प्रशासन अपयश लपण्याचा प्रयत्न करीत आहे. नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात जिल्हा प्रशासनाला आलेले अपयश लपविण्यासाठी व्यापाऱ्यांच्या खांद्यावरून निशाना लावला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते विजय मालोकार यांनी केला आहे.

हेही वाचा - एसटीतून उतरतानाच पडला बसचालक

नाभिक संघटनेचा विरोध
नाभिक समाज दुकानदार संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देवून जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन शांताराम वाघमारे यांच्या नेतृत्वात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन देवून नाभिक समाजाच्या दुकानदारांना जनता कर्फ्यूमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.

जनता रस्तावर असेल तर कर्फ्यूचा फायदा काय?
व्यापारी संघटनांनी त्यांची प्रतिष्ठाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शासकीय कार्यालये, बँका, बससेवा सुरूच राहणार असल्याने जनता रस्त्यावरच राहणार आहे. त्यामुळे जनता कर्फ्यू करून कोरोनाची साखळी खंडित करण्याचा उद्देश कसा साध्य होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॅकअप प्लॅन आवश्यक
पाच दिवस बंदचे व्यापाऱ्यांनी आवाहन केले आहे. या काळात कामाशिवाय कोणीही बाहेर पडणार नाही, याची जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने व्यवस्था करणे आवश्यक आहे. शिवाय पाच दिवसांमध्ये प्रशासनाकडून पुढे संसर्ग होणाऱ्या नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी बॅकअप प्लॅन तयार केला नाही तर जनता कर्फ्यू वाझोंडा ठरणार आहे. जिल्ह्यात किमान येत्या काळात पाच हजार बेडची आवश्यकता पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून आताच तयारी करण्याची गरज आहे. रुग्ण संख्या वाढू नये म्हणून जनजागृती व नियमांचे काटेकोर पालन करून घेण्याची गरज आहे. त्याची तयारी प्रशासनाकडून करणे अपेक्षित होते, असा सूरही जनतेमध्ये उमटत आहे.

अकोल्यातील व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यु जाहीर केलाय, त्या व्यापाऱ्यांनी त्यांचे आस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या मजूर आणि कामगारांना पाच दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे का, याचे उत्तर त्यांनी अकोल्यातील जनतेला दिले पाहिजे.
- राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी

सहा महिन्यात फुटपात विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणतीच व्यापारी संघटना पुढे आली नाही. सर्व व्यवहार सुरू झाले असतानाही फुटपात विक्रेत्यांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिनाभर प्रशासनाकडे फेऱ्या घालाव्या लागल्यात. ही सर्व मंडळी हातावर पोट असलेली आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यामुळे विदर्भ चेबर ऑफ कामर्स च्या पाच दिवसांच्या बंदला झुंज फुटपात संघटनेचा विरोध आहे.
- बाळू ढोले, जिल्हाध्यक्ष, झुंज फुटपात संघटना

सर्वांच्या पाठिंवाच्या आवश्यकता आहे. काया फायदा होणार यापेक्षा काही वाईट होणार नाही. झाला तर फायदाच होईल. सर्वांनी जबाबदारी घेतल्याशिवाय कोरोनाचे संकट जाणार आहे. काळजी घेणे आवश्यक आहे. संक्रमित होणार नाही याची दक्षात घ्या. प्रतिकार वाढवा. जनतेने व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला साथ द्यावी व स्वतःची काळी घ्यावी.
-बच्चू कडू, पालकमंत्री, अकोला जिल्हा

लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यू पर्याय नाही- आमदार सावरकर
अकोला शहर व जिल्ह्यात, अकोला विदर्भ चेंबर आँफ काँमर्स व काही व्यावसायिक, उद्योजक संस्थांनी नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य सुरक्षित रहावे, या उदात्त भावनेने ता. २५ ते २९ सप्टें. असा ५ दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. हा एक मानवतावादी आदर्श आहे. परंतु नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आजच्या घडीला लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यु मात्र पर्याय होऊ शकत नाही, असे आमदार रणधीर सावरकर यांनी म्हटले आहे.

मागील ६ महिन्यांपासून अधिक काळापासून सामान्य जनजीवन विस्कळीत झालेले आहे. सामान्य माणूस या महामारीच्या दहशतीच्या मानसिक तणावाखाली आहे. शेतकरी, मजूर, कामगार यांच्या समोर रोजच्या उदरनिर्वाहाचे संकटासोबतच जीवन आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.

कोविड-१९ च्या संसर्गासोबत जागतिक संघर्ष सुरू आहे. अशा परीस्थितीत सेवा भावी संस्थांनी जगण्याच्या गतीला खीळ घालणाऱ्या जनता कर्फ्यू सारखे उपाय योजन्या पेक्षा, रूग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये, ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, मास्क, औषधे उपलब्ध करावी. जीवनाच्या गतीची ऊलटी चाके फिरविण्यापेक्षा कोविड विषाणू नष्ट होईपर्यंत त्यासोबत राहून त्याचा मुकाबला कसा करता येईल.

यासाठी समुपदेशक सेवा पुरविणाऱ्या सामाजिक बांधिलकीचे ऊपक्रम राबविणे ही आजची गरज आहे. ज्या शहरात असे कर्फ्यू लादल्या गेले, तेथे काय परीस्थिती झाली? काय फायदा झाला? केसेस वाढल्या काय? हे ही तपासून पहाने आवश्यक आहे. कोणताही निर्णय शास्त्रीय पद्धतीने व प्रमाण कसोटीवर उतरणारा असावा लागतो.

त्याशिवाय जनता कर्फ्यू सारखे निर्णय खऱ्या अर्थाने हितावह व समर्थनिय वाटत नसल्याने अशा निर्णयांचा व्यापक विचारांती फेरनिर्णय होणे आवश्यक असल्याने या घोषित जनता कर्फ्यूचे प्रामाणिक समर्थन मात्र मला करता येणार नाही. कर्फ्यु ऐवजी प्रतिबंधात्मक सर्व उपाय योजनांसाठी सामूहिक उपक्रम सर्वांचे समन्वयातून राबविण्यास विनंती आहे, असे आमदार सावरकर म्हणाले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Five days public curfew from today, Akolekar Confuse