मोतसावंगा धरणाच्या सांडव्यात चार जणांचा मृत्यू, चारही मृतदेह सापडले, गावावर शोककळा

शरद येवले
Tuesday, 22 September 2020

धरणाच्या सांडव्यात चार जण वाहून गेल्याची घटना तालुक्यातील मोतसावंगा धरणावर ता.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. वाहून गेलेल्या चारही जणांचे मृतदेह बचाव पथकाला सापडले. या घटनेने मोतसावंगा गावावर शोककळा पसरली आहे.

मंगरुळपीर (जि. वाशीम) :  धरणाच्या सांडव्यात चार जण वाहून गेल्याची घटना तालुक्यातील मोतसावंगा धरणावर ता.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. वाहून गेलेल्या चारही जणांचे मृतदेह बचाव पथकाला सापडले. या घटनेने मोतसावंगा गावावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मोतसावंगा येथील भाऊराव खेकडे (वय ६५), दिलीप वाघमारे (वय ३५), गोपाल जामकर (वय ३०) व महादेव इंगळे (वय ३०) सर्व रा. मोतसावंगा हे शेतात गेले होते. परंतु घरी येत असताना तेथील धरणातील सांडव्यात मोठ्या प्रमाणावर पाणी ओसंडून वाहत होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या सांडव्यात वरील चारही जण वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या वतीने विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती नुसार पाण्याच्या प्रवाहाचा वेग इतका होता की, दोघे जणांचा पाण्यात तोल गेला आणि ते वाहत गेले. त्यांना वाचवण्यासाठी इतर दोघांनीही धाव घेतली.

पण तेही पाण्यात वाहून गेले. विशेष म्हणजे, हे चौघांना ही धरणात पोहण्याचा अनुभव होता. मात्र, पाण्याचा प्रचंड वेग असल्याने ते वाहून गेले. घटनेची माहिती सुरुवातीला गावकऱ्यांना मिळताच त्यांनी चारही जणांचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरले. अगोदर त्यांना भाऊराव खेकडे यांचा मृतदेह सापडला.

इतर तिघांचेही मृतदेह दुपारी ४ वाजताच्या दरम्यान सापडले. घटनास्थळी मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार किशोर बागडे, आसेगाव पोलसि ठाण्याचे ठाणेदार खंदार हे तळ ठोकून होते. जिल्हा परिषदेच्या सदस्य मोरे, पंचायत समितीचे सदस्य श्रीकांत ठाकरे, वसंत भोंडणे, महादेव सातपुते व मोतसावंगा येथील गावकरी घटना स्थळावर उपस्थित होते.

मृतदेहांचा शोध सुरू असताना घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश होता. परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. एकाच गावातील चार युवकांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Four dead, four bodies found in Motsavanga dam drain, mourning in the village