
अकोला ः एरव्ही ‘हमीभाव’ म्हणजे ‘डमीभाव’ असे विनोदाने व नाराजीच्या स्वरात सर्वत्र बोलले जायचे. यावर्षी मात्र पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव किंवा त्यापेक्षाही अधिक भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. सध्या सोयाबीन, तूर व हरभरा या मुख्य पीक उत्पादनाला बाजार समितीमध्ये हमीभाव मिळत असून, हरभऱ्याचे भाव वधारून प्रतिक्विंटल ५१५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
केंद्र सरकारद्वारे दरवर्षी शेतमालाच्या किमान आधारभूत किमती (हमीभाव) निर्धारित केल्या जातात. परंतु, कधीच शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून किमान आधारभूत किमत मिळत नाही.
त्यामुळे नेहमीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. व्यापाऱ्यांकडून होणारी लूट टाळण्यासाठी व कष्ठातून उत्पादीत केलेल्या शेतमालाला किमान आधारभूत किमत तरी मिळावी म्हणून शेतकरी शासकीय शेतमाल खरेदी केंद्रांवर रीघ लावतात. मात्र, तेथेही दरवेळी त्यांची निराशा होत असून, शासकीय केंद्रांकडून त्यांचा ५० टक्केही शेतमाल खरेदी केला जात नाही.
शेवटी पर्यांय नसल्याने कवडीमोल दराने त्यांना व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकावा लागतो. यावर्षी मात्र पहिल्यांदाच सोयाबीनला हमीभावापेक्षा जवळपास दुप्पट व तुरीला हमीभावापेक्षा हजार रुपये अधिक भाव मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे रब्बीतील मुख्य पीक असलेल्या हरभऱ्यालाही आता बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असून, बुधवारी (ता.७) अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला प्रतिक्विंटल कमाल ५१५० रुपये भाव मिळाला.
शेतमाला | हमीभाव (प्रतिक्विंटल) | बाजार समितीमधील कमाल भाव |
फरक |
सोयाबीन | ३८८० रुपये | ६३०० रुपये. | २४२० रुपये |
तूर. | ६००० रुपये | ७००० रुपये | १००० रुपये |
हरभरा | ५१०० रुपये | ५१५० रुपये | ५० रुपये |
उत्पादन घटले अन् भाव वधारले
उत्पादन अधिक होऊनही बऱ्यावेळा योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसानच सहन करावे लागते. यावर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसाचा फटका बसून, खरिपात सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, तूर आणि रब्बीत वातावरणातील बदलामुळे हरभरा उत्पादन घटले. त्यामुळे बाजारात दरवर्षीपेक्षा निम्म्याहून कमी आवक झाली आहे. परंतु, भाव वधारले असून, पहिल्यांदाच सोयाबीन, तूर, हरभऱ्याला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.