
श्री मुंगसाजी महाराज सहकारी सूत गिरणीच्या सुताच्या गोडाऊनला मंगळवारी रात्रीदरम्यान लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे ७ ते ८ कोटी रूपयाचा सूत व मशिनरी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीवर १४ तासानंतर बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळविण्यात यश आले.
चिखली (जि. बुलडाणा) : श्री मुंगसाजी महाराज सहकारी सूत गिरणीच्या सुताच्या गोडाऊनला मंगळवारी रात्रीदरम्यान लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे ७ ते ८ कोटी रूपयाचा सूत व मशिनरी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीवर १४ तासानंतर बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळविण्यात यश आले.
साकेगाव रोडवरील अनुराधा नगरस्थित मुंगसाजी महाराज सहकारी सूत गिरणीच्या सुताच्या गोडाऊनला रात्री १२ ते 3 दरम्यान आग लागल्याचे लक्षात आले. याबाबत गिरणीच्या संचालकांना माहिती मिळताच सर्वांनी सूतगिरणीकडे धाव घेतली. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. गोडाऊनमध्ये सूत अधिक प्रमाणात असल्या आगीने लगचेच रौद्र रूप धारण करून संपूर्ण गोडाऊनला आगीने कवेत घेतले.
यामध्ये सुमारे दिड कोटींचा सूत, सुमारे साडेतीन कोटीच्या दोन सूत जोणाऱ्या ऑक्टो कोलर मशीन जळून खाक झाले आहे. आगीची तीव्र झळ इमारतीलासुद्धा बसली असून, स्लॅब क्रॅक झालेला आहे. ता.३ नोव्हेंबरच्या रात्री १ वाजेच्या सुमारास लागलेली आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले.
गोडाऊनमध्ये सुताचे बंडल असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होऊन बसले होते. सुमारे १४ तासांनतर ४ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आली असली तरी यात मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पंचनाम्याअंती नुकसानीचा निश्चित आकडा व आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
(संपादन - विवेक मेतकर)