गुड न्यूज:  शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न सुटला, विमा कंपनी आज देणार रक्कम

मनोज भिवगडे
Monday, 21 September 2020

पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम २०१९ मधील दहीगाव (गावंडे), कौलखेड (जहांगीर), पळसो तेलखेड, बहिरखेड, रामगाव, महादलपूर, बहादलपूर, शहापूर सह २५ शिवारातील शेतकऱ्यांची विमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोला :  पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम २०१९ मधील दहीगाव (गावंडे), कौलखेड (जहांगीर), पळसो तेलखेड, बहिरखेड, रामगाव, महादलपूर, बहादलपूर, शहापूर सह २५ शिवारातील शेतकऱ्यांची विमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विमा कंपनीने ६६५ शेतकऱ्यांच्या खात्यात १ कोटी ६ लाख ९०८ रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार सोमवार, ता. २१ सप्टेंबर रोजी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी ता. २१ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा दिलेला इशारा मागे घेतला आहे.

खरीप हंगाम २०१९ मधील मंजूर असलेली पंतप्रधान पीक विमा योजनेची रक्कम प्रशासकीय चुकीमुळे रखडली होती. त्यात प्रामुख्याने पळसो बढे मंडळातील दहीगाव (गावंडे), कौलखेड (जहांगीर), पळसो तेलखेड, बहिरखेड, रामगाव, महादलपूर, बहादल पूर, शहापूर इत्यादी २५ गावांचा समवेश होता. पळसो बढे येथील महाराष्ट्र बँकेतून तब्बल ६६५ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. या शेतकऱ्यांना मंजूर रकमेनुसार विमा रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय चुकीचा फटका या शेतकऱ्यांना बसला. परिणामी हे शेतकरी विम्‍या रक्कमेपासून वंचित राहिले होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

 १० सप्टेंबरपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यामुळे त्यावेळी घोषित आंदोलन मागे घेतले. प्रशासनाने दिलेल्या वेळेत रक्कम जमा न झाल्याने आमदारांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला होता.

अखेर, ता. २० सप्टेंबर रोजी दिल्ली येथील विमा दावा विभागाचे अधिकारी दिपेश यादव यांनी मुंबई येथील क्षेत्रिय अधिकारी श्रीमती शकुंतला शेट्टी यांना दावा मंजुरीचे आदेश पाठविले. त्यानुसार श्रीमती शेट्टी यांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी डॉ. के.बी खोत यांना पत्र देऊन या संदर्भात माहिती दिली व २१ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासंदर्भात नियोजन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पाफळकर व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय खडसे यांनी आमदार रणधीर सावरकर यांना माहिती दिली. त्यानंतर उपोषणाचा इशारा मागे घेण्यात आला.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Insurance company to pay today; MLA Randhir Savarkars warning of fast is back