शेतकऱ्यांची थट्टा; मका, ज्वारी खरेदी केंद्र सुरू होण्या पूर्वीच बंद

सदानंद खारोडे
Friday, 18 December 2020

तालुक्यात मक्का ज्वारी खरेदी केंद्र सुरू चालू होण्यापूर्वी राज्यात मका, ज्वारी खरेदीचा कोठा पूर्ण झाल्याने साईड बंद पडल्यामुळे तेल्हारा येथील केंद्र सुरू होण्या आधीच बंद पडले आहे.

तेल्हारा (जि.अकोला) : तालुक्यात मक्का ज्वारी खरेदी केंद्र सुरू चालू होण्यापूर्वी राज्यात मका, ज्वारी खरेदीचा कोठा पूर्ण झाल्याने साईड बंद पडल्यामुळे तेल्हारा येथील केंद्र सुरू होण्या आधीच बंद पडले आहे.

शासनाने आधारभूत योजने अंतर्गत मका, ज्वारी खरेदी चालू करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली होती. या आधी येथिल खरेदी-विक्री संस्थेत मागिल वर्षी हरभरा, मका खरेदीमध्ये अनियमता केल्याने जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी तेल्हारा खरेदी विक्री संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचे पत्र नाफेड कार्यालय मुंबई यांना देण्यात आले होते. त्यानंतर तेल्हारा येथे नाफेडने मका, ज्वारी खरेदी करण्यासाठी एकाही संस्थेला खरेदी करण्यासाठी आदेश दिले नाही.

त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी बाळापूर येथील स्व. वसंत रावजी दादंळे खासगी कृषी बाजार पारस या संस्थेला तेल्हारा येथे मका, ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आदेश दिले होते. त्यानंतर दोन दिवसांनी राज्यात मका, ज्वारी खरेदीचा कोटा पूर्ण झाल्याने साईड बंद पडल्या. त्यामुळे तेल्हारा येथील केंद्र सुरू होण्यापूर्वी बंद पडल्याने शेतकरी मका, ज्वारीची ऑनलाईन नोंदणी करू शकले नाही.

हरभरा पेरणी बारा हजार हेक्टरवर
शासनाने तेल्हारा येथे हरभरा, तूर खरेदी करण्यासाठी पुन्हा बाळापूर येथील स्व. वसंत रावजी दादंळे खासगी कृषी बाजार पारस या संस्थेला आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे. यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंड अळी आल्याने कपाशी पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. मात्र या तालुक्यातील सिंचन असल्याने शेतकऱ्यांनी कपाशी उपटून त्यामधे मोठ्या प्रमाणात हरभरा पेरणी केली आहे. यावर्षी तालुक्यात बारा हजार सातशे हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी झाल्याची माहिती कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी दिली.

तालुक्यात यावर्षी तूर, हरभरा पेरणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकरी यांचे नुकसान होणार नाही याची शासनाने दखल घेत तेल्हारा येथे नाफेडने माल खरेदी करावा.
- किशोर खारोडे, शेतकरी तथा माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हारा

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Maize, sorghum shopping center closed before opening