esakal | व्यापाऱ्यांनी झुगारला लॉकडाउन!, शहरातील अनेक दुकाने उघडी

बोलून बातमी शोधा

akola news Merchants lock down Zugar !, many shops open in the city

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून लादण्यात आलेले निर्बंध अखेर दिसऱ्या दिवशी अनेक व्यापाऱ्यांनी झुगारून व्यवसाय सुरू केले. अकोला शहातील काला चबुतरा, नवीन कापड बाजार, टिळक रोड, गौरक्षण रोड, सिंधी कॅम्प, जुने शहर, जठारपेठ, अकोट फैल, रामदास पेठ, ताजनापेठ आदी परिसरातील व्यापाऱ्यांनी शासन व प्रशासनाच्या आदेशाला विरोध दर्शवित गुरुवारी दुकाने उघडली

व्यापाऱ्यांनी झुगारला लॉकडाउन!, शहरातील अनेक दुकाने उघडी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून लादण्यात आलेले निर्बंध अखेर दिसऱ्या दिवशी अनेक व्यापाऱ्यांनी झुगारून व्यवसाय सुरू केले. अकोला शहातील काला चबुतरा, नवीन कापड बाजार, टिळक रोड, गौरक्षण रोड, सिंधी कॅम्प, जुने शहर, जठारपेठ, अकोट फैल, रामदास पेठ, ताजनापेठ आदी परिसरातील व्यापाऱ्यांनी शासन व प्रशासनाच्या आदेशाला विरोध दर्शवित गुरुवारी दुकाने उघडली. ग्रामीण भागातही व्यापऱ्यांनी आदेशाविरुद्ध एल्गार पुकारत व्यवहार सुरू ठेवले. विशेष म्हणजे, प्रशासनाकडूनही त्यांना कोणताच विरोध झाला नाही.

अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे दररोज २५० ते ३०० रुग्ण आढळत आहेत. मृत्यूचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हाधिकारी यांनी ता. ५ ते ३० एप्रिलदरम्यान दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी घोषित केली आहे. जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने या काळात बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. वर्षभरापासून कोरोना नियमांचे पालन करीत असलेल्या व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडून आवाहन केल्यानुसार कोरोना चाचणीही करून घेतली. मात्र, त्यानंतरही प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आल्याने व्यापाऱ्यांचा संयम सुटला.
.............
पहिल्या दिवसापासूनच विरोध
लॉकडाउनच्या निर्णयाचा आदेश निघाल्यापासूनच व्यापाऱ्यांनी पहिल्याच दिवसापासून या आदेशाला विरोध करण्यास सुरुवात केली होती. नवीन कापड बाजारातील व्यावसयिकांनी त्यांची प्रतिष्ठाने पहिल्याच दिवसापासून सुरू ठेवली होती. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी धरणे, मोर्चा काढून तर लोकप्रतिनिधींना निवेदने देवून व्यापार सुरू ठेवण्याची विनंती केली. तिसऱ्या दिवशी बहुतांश व्यापाऱ्यांचा संयम सुटला. अनेक मोबाईल व्यावसायिक, कापड व्यावसायिक, हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर त्यांची प्रतिष्ठाने व हातगाड्या लावून व्यवसाय केला.
...............
प्रशासनाकडून प्रतिबंध नाही
जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाची महानगरपालिका हद्दीत अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यानंतरही प्रशासनाकडून या व्यावसयिकांना कोणताही प्रतिबंध करण्यात आला नाही. त्यामुळे ज्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. आम्हीच नियम का पाळावे, असा प्रश्नही त्यांच्याकडून आता विचारला जाऊ लागला आहे.
.......................
पुढे बंद, मागून व्यवहार
अकोला शहरातील अनेक मोठी प्रतिष्ठाने गुरुवारी बंद असल्याचे दिसून आले. मात्र, प्रत्यक्षात मागच्या दाराने त्यांचे व्यवसाय सुरू होते. यात प्रामुख्याने काही प्रतिष्ठीत सराफा व्यावसायिकांचाही समावेश होता.
.......................
व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांचे पालन हे साऱ्यांच्या हिताचे आहे. तेव्हा निर्बंधांचे पालन करून व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी येथे केले. जिल्ह्यातील दुकाने व व्यवसाय सुरू करण्याबाबत निर्बंधातून सुट मिळावी व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी केली. याबाबत व्यापारी संघटनांची बैठक नियोजन भवनात झाली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा,पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम तसेच अन्य अधिकारी व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
(संपादन - विवेक मेतकर)