शाहरुखच्या मराठमोळ्या ड्रायव्हरचे निधन, अकोल्याचा 'मोहन' ते किंग खानचा 'शूमाकर'

विवेक मेतकर
Friday, 4 September 2020

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या वाहन चालकाचे निधन झाले. मूळ अकोल्याचे रहिवासी असलेल्या मोहन झिंगूजी डोंगरे यांची किडनीच्या विकाराने प्राणज्योत मालवली.

अकोला : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या वाहन चालकाचे निधन झाले. मूळ अकोल्याचे रहिवासी असलेल्या मोहन झिंगूजी डोंगरे यांची किडनीच्या विकाराने प्राणज्योत मालवली.

मोहन डोंगरे हे अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा येथील रहिवासी होते. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी अकोला सोडून मुंबई गाठली. रोजगाराच्या शोधात त्यांनी मायानगरीत मुक्काम ठोकला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

1989 मध्ये एका जाहिरातीच्या माध्यमातून मोहन डोंगरे यांची शाहरुख खानशी ओळख झाली. तेव्हापासून वाहन चालक म्हणून ते शाहरुखच्या कुटुंबाकडे कामाला लागले. जवळपास तीस वर्षांपासून ते खान परिवाराचे सदस्य झाले होते.

 

शाहरुखचं नोव्हेंबर 2012 मध्ये एक ट्वीट केले होते. त्यात त्याने मोहन यांचा ‘शूमाकर’ असा उल्लेख केला होता. “डोक्यावर सूर्य तळपतो आहे. रेडिओवर सेल्फ कंट्रोल आहे आणि माझा माणूस मोहन (शूमाकर) स्टेअरिंगवर आहे” असे ट्वीट शाहरुखने केले होते.

दुर्दैवाने गेल्या तीन वर्षांपासून मोहन डोंगरे यांना किडनीचा आजार झाला होता. गेल्या काही दिवसात त्यांचा आजार बळावला. त्यातच 25 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. खान परिवाराने मोहन डोंगरे यांना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले, मात्र त्याला यश आले नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Mohan King Khans 'Schumacher, Shah Rukhs Marathmolya driver dies