दोन लेकरं...दोन कुटुंब...पालकांना अडणावही माहित नाही अन् खुलं झालं शिक्षणाचं रंगीत आकाश

विवेक मेतकर
Wednesday, 7 October 2020

दोन लेकरं ...दोन कुटुंबातील...पालकांना आडनाव काय तेही माहिती नाही...मग जन्मतारीख माहिती असणं अशक्यच.... तारीख जरी माहीत नसली तरी अंदाजे कोणत्या सण उत्सवाच्या दरम्यान यांचे जन्म झाले यावरून त्यांच्या जन्माचा अंदाज घेऊ म्हणून कौन से मौसम में इन बच्चो का जन्म हुआ? असा प्रश्न विचारला तेव्हा लेकरांची आई सांगू लागली...

अकोला :  दोन लेकरं ...दोन कुटुंबातील...पालकांना आडनाव काय तेही माहिती नाही...मग जन्मतारीख माहिती असणं अशक्यच.... तारीख जरी माहीत नसली तरी अंदाजे कोणत्या सण उत्सवाच्या दरम्यान यांचे जन्म झाले यावरून त्यांच्या जन्माचा अंदाज घेऊ म्हणून कौन से मौसम में इन बच्चो का जन्म हुआ? असा प्रश्न विचारला तेव्हा लेकरांची आई सांगू लागली...

आकाश...बारिश सुरू हुई तब हुवा, इसलिए उसका नाम आकाश रखा.

अन मुलीच्या आईने सांगितले ...

रंगीता...., होली के समय हुई थी इसलिए उसका नाम रंगीता रखा.

असा, जन्माचा अंदाज पालकांनी सांगीतला...

अन्

खुलं झालं शिक्षणाचं रंगीत-आकाश
निसर्गाच्या सानिध्यात राहणारी विशाल मनाची, कष्टाचं खाणारी ही माणसं आपल्या लेकरांची नावे किती छान ठेवतात याचा मनोमन आनंद वाटला.या पालकांच्या सूचक निर्देशानुसार आकाश व रंगीता नेमकी कोणत्या तारखेला जन्माला आले हे समजत नसले तरी ती दोन्ही लेकरं शाळेत दाखल होणे महत्वाचे.पालक लेकरांचे वय सांगत असले तरी दिनांक अंदाजे निवडणे गरजेचे होते म्हणून पालकांच्या संमती पत्रानुसार आकाशला जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा कार्ला येथील शिक्षक उमेश तिडके यांची 26 जून ही जन्मतारीख दिली तर रंगीता होळी उत्सवात जन्माला आली म्हणून माझी 28 मार्च ही जन्मतारीख तिला दिली.अन खुले केलं शिक्षणाचं रंगीत-आकाश ह्या बारेला परिवाराच्या पहिल्या पिढीच्या पुढ्यात...

सातपुड्याच्या पायथ्याशी शिक्षकांनी बारेला परीवराच्या पुढ्यात आणली शिक्षणाची गंगोत्री
खंडाळा येथील जिल्हा परिषद शिक्षक तुळशीदास खिरोडकर आणि सहकारी शिक्षक गोपाल मोहे, निखिल गिऱ्हे ,सुरेखा हागे, श्रीकृष्ण वाकोडे ,ओमप्रकाश निमकर्डे, राजेंद्र दिवनाले यांच्या प्रेरक सहकार्याने व केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, मुख्याध्यापिका शीला टेंभरे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षण प्रेमी दिनकर धुळ यांच्या मार्गदर्शनात बारेला परिवाराची पहिली पिढी सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी अकोला जिल्ह्यात,तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद व.प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथे दाखल झाली.

पेढे वाटून आनंद
एकीकडे देशाचं स्वातंत्र्य म्हातारं होत आहे तरी शिक्षण घरोघरी पोचले नाही हे दुर्देव दुःखद असलं तरी आकाश, रंगीता च्या रुपात बारेला परिवाराची पहिली पिढी बालरक्षक म्हणून शिक्षणाच्या अवकाशात आणली हे पण आनंदाचीच बाब म्हणून सहकारी शिक्षक मित्र गोपाल मोहे व निखिल गिऱ्हे यांनी उपस्थित सर्वाना पेढे  देऊन आनंदोत्सव साजरा केला.

शालेय साहित्य भेट
आकाश व रंगीता ला शैक्षणिक साधनाची ओळख व आवड व्हावी म्हणून शिक्षक मित्रांपैकी कुणी गणवेश तरी कुणी दफ्तर -पाटी तर कुणी अक्षर ओळख करणारी पुस्तकं भेट दिली. ही लेकरं जाता येता जेव्हा जेव्हा निदर्शनास येतात तेव्हा पाटीवर पुस्तकातील अक्षर चित्रे गिरवताना दिसतात. हे पाहून मना ला प्रत्येक भेटीत आनंदी आनंद वाटतो.

माय - बाप आनंदले
आकाश व रंगीता यांना जेव्हा दाखल करण्यासाठी शाळेत आणले तेव्हा शिक्षक मित्रांनी दिलेला गणवेश त्यांना परिधान करण्यात आला. गणवेशात आपले लेकर पाहून आई-वडिलांच्या चेहऱ्यावर सुखद आनंद दिसून आला. हे चित्र उपस्थित सर्व शिक्षकांना मनःपूर्वक सुखावणारं होतं.

शेताच्या बांधावरच शाळा
कोरोना महामारी च्या काळात शाळा बंद असल्याने आकाश व रंगीता ह्या नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील सहकारी शिक्षक शाळा भेटीच्या दिवशी शेत शिवारात जाऊन ह्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेतात .शेत बांधावरच अक्षर चित्रांची ओळख जाता-येता करून देतात. त्यामुळे आकाश रंगीता सह सर्व सहकारी शिक्षकांनाही शेतात बांधावर शाळेचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.

अन तो आमचा गुरू बनला
आम्ही (निखिल गिऱ्हे व मी )टू व्हीलर ने शाळेत जाता येता आकाश च्या शिवारातील झोपडी जवळ थांबतो. प्रत्येक भेटीत त्याच्या आई-वडिलांना नमस्ते करुन अभिवादन करतो. याघटनेचे निरीक्षण आकाशने अचूक टिपलं. चार-पाच दिवसानंतर आम्ही पोहचताच आकाशने नमस्ते सर म्हणून शिक्षकांना अभिवादन केले.

आकाश चे हे वर्तन मनाला उच्च कोटीचा आनंद देणारे होते. वर्तन बदल होणे म्हणजेच शिक्षण. मनुष्य निरीक्षणातून शिकत असतो. हे आकाशने त्याच्या वर्तन बदलातून दाखवून दिले म्हणून लेकरांच्या अवतीभोवतीचे वातावरण अत्यंत प्रेरणादायी सकारात्मक असायला हवे याचा पाठच आकाशने आम्हाला करून दिला. अन या वळणावर आकाश आमचा गुरू बनला.

शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात जगताना आकाश व रंगीता यांची झालेली भेट नवा अनुभव नि जगण्याचं कौशल्य शिकविनारी.लेकरं शिकतातच फक्त त्यांच्या सभोवती अध्ययन अनुभव पेरायला हवेत.ही लेकरं सुध्दा शिकतील , प्रवाहात आनंदानं प्रवास करुन जगणं शिकतील. बारेला या आदिवासी परीवाराची ही पहिली पिढी नाही तर येणाऱ्या सर्व पिढ्यांच्या पुढ्यात शिक्षण असेल असा विश्वास आकाश व रंगीता च्या आनंदी वर्तन बदलातून दिसून येतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Open doors of education, teachers initiative for adivasi chindren