बंदुकीच्या धाकावर लुटणाऱ्या दाम्पत्यावर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

मनोज भिवगडे
Monday, 21 September 2020

 बळजबरी घरात शिरून शस्राच्या धाकावर लुटमार करणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी रविवारी पाठलाग करून अटक केली. चोरीची घटना तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर येथे घडली. यातील आरोपींकडून ५.७० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

तेल्हारा/अकोट  : बळजबरी घरात शिरून शस्राच्या धाकावर लुटमार करणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी रविवारी पाठलाग करून अटक केली. चोरीची घटना तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर येथे घडली. यातील आरोपींकडून ५.७० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

तेल्हारा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाडी अदमपूर येथे ताराचंद नारायणदास बजाज यांना रविवारी रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी हातपाय बांधून मारहाण केली व घरातील सोन्याचे दागिणे व रोख रकम घेवून पळ काढला. ही माहिती तेल्हारा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विकास देवरे ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. बजाज (वय ६२) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून आरोपींना शोधण्यासाठी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

नाकाबंदी दरम्यान एका पलसर मोटारसायकलवर दोन व्यक्ती जोरात शेगाव नाका येथून घोडेगावकडे जाताना दिसले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असताना त्यांनी पळ काढला. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक नीलेश देशमुख व पोलिस कर्मचारी राजू इंगळे, राजेश्वर सोनोने, गजानन राठोड, अमोल नंदाणे, अविनाश डाबेराव यांनी मोटारसायकलस्वाराचा पाठलाग केला. पडसोद फाटा येथे सहायक पोलिस निरीक्षक फड व तेल्हाराचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश देशमुख यांनी मोटारसायकलवरील दोघांना नाकाबंदीदरम्यान अटक केली.

मोटारसायलक स्वाराने त्याचे नाव अस्लम उर्फ अहमद शहा यासीन शहा (वय २१ वर्ष) व सोबत असलेल्या युवतीचे नाव मुस्कान बी अस्लम शहा (वय २०) दोन्ही रा. इंदिरा नगर तेल्हारा हल्ली मुक्काम भीमनगर शिवनी अकोला अशी माहिती दिली. त्यांची झाडा झडती घेतली असता आरोपी अस्लम शहा जवळून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस आढळू आले. त्यानंतर शिवनी येथील त्याच्या घराची झाडाझडती घेतली. तेथे त्यांनी लुटलेला मुद्दमाल आढळून आला. तेल्हारा पोलिसांनी आरोपीवर कलम ४५२, ४५७, ३९४, भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीच्या घरात आढळला चोरीचा मुद्देमाल
शिवनी येथील आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात पोलिसांना दोन सोन्याचे चैन, सोन्याच्या ६ अंगठ्या, एक सोन्याची पोथ, एक गोडा हार, एक नथ बिंदी व कानातील रिंग जोड, कानातील जोड, तांदुळ मणी पंडल पोथ, एक पीस पंडल मणी पोथ, एक पंडल, कानातले साखडी जोड, चांदीच्या ३ वाट्या व ३ ग्लास, रोख एक हजार रुपये आदी साहित्य आढळून आले. आरोपीकडून काळया रंगाची पलसर गाडी जप्त करण्यात आली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमाल ५ लाख ७० हजार ५०० रुपयांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Police take cinestyle action against a couple who robbed at gunpoint