संत रामराव महाराजांच्या गुरूगादीवर महंत बाबुसिंग महाराज यांची निवड

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 4 November 2020

पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या गुरूगादीचे पीठाधीश म्हणून बाबूसिंग महाराज यांची आज सोमवारी (ता. ३) एकमताने नेमणूक करण्यात आली. या गादीचे पीठाधीश धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे ता. ३० ऑक्टोबर रोजी निधन झाले होते.

मानोरा (जि.वाशीम) ः पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या गुरूगादीचे पीठाधीश म्हणून बाबूसिंग महाराज यांची आज सोमवारी (ता. ३) एकमताने नेमणूक करण्यात आली. या गादीचे पीठाधीश धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे ता. ३० ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या या गादीचे वारस म्हणून परंपरेनुसार त्यांच्या पंचमीच्या कार्यक्रमात ही निवड करण्यात आली.

संत रामराव महाराज यांचा पुढील वारसा चालविण्याकरीता भीमा नायक, खेमा नायक व हेमा नायक यांच्या घराण्यांची बैठक घेण्यात आली. त्यांच्या वारसांनी एकमताने संत रामराव महाराज यांचे वंशज महंत बाबूसिंग महाराज यांची गोरधर्मपीठाधीश म्हणून एकमताने निवड केली व तशी माहिती जाहीर केली.

यावेळी उमरी, वाईगौळ व पोहरादेवी येथील तिन्ही घराण्यातील महाराजांचे वंशज हरीचंद राठोड, अनिल राठोड, महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत संजय महाराज, महंत यशवंत महाराज व संत रामराव बापू यांचे निकटवर्तीय भक्तगण यांची उपस्थिती होती.

या वेळी संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी पंचकलश ठेवण्यात आले व सर्व वंशजांनी मंदिर निर्माणाच्या कार्यास सुरुवात केली व रामरावबापू यांचा अस्थीकलश देशभर फिरवण्याचा संकल्प करण्यात आला. हा कलश पोहरादेवी येथून निघून देशाच्या कानाकोपऱ्यात भक्तांच्या दर्शनासाठी फिरविला जाईल, असे वंशजांच्या वतीने सांगण्यात आले. महंत बाबूसिंग महाराज हे संत रामराव महाराज यांचे पुतणे आहेत. गोरपीठाची गुरूपरंपरा आता महंत बाबूसिंग महाराज हे चालविणार आहेत.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Selection of Mahant Babusingh Maharaj on the Gurugadi of Sant Ramrao Maharaj