‘आत्मनिर्भर’ दिव्यांग दाम्पत्याने घालून दिला आदर्श

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 28 November 2020

कोरोना साथीमुळे अवघं जीवनमान बदललंय. जीवनाचे आयामच नवे झाले. सामान्य धडधाकट व्यक्तिंची ही कथा तर निसर्गाने ज्यांना न्यूनत्व दिलंय त्या दिव्यांगांची काय कथा. अकोला शहरातील सुभाष माहुलकर या दृष्टीहीन दिव्यांग व्यक्तीने शासनाच्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या आवाहनाला प्रतिसाद देत, कुटुंबाची जबाबदारी व व्यवसाय सांभाळत आपली गुजराण सकारात्मकतेने सुरू ठेवली आहे.

अकोला  ः कोरोना साथीमुळे अवघं जीवनमान बदललंय. जीवनाचे आयामच नवे झाले. सामान्य धडधाकट व्यक्तिंची ही कथा तर निसर्गाने ज्यांना न्यूनत्व दिलंय त्या दिव्यांगांची काय कथा. अकोला शहरातील सुभाष माहुलकर या दृष्टीहीन दिव्यांग व्यक्तीने शासनाच्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या आवाहनाला प्रतिसाद देत, कुटुंबाची जबाबदारी व व्यवसाय सांभाळत आपली गुजराण सकारात्मकतेने सुरू ठेवली आहे.

सुभाष भिमराव माहुलकर हे रणपिसेनगर, राऊतवाडी रोड या भागात भाजीपाला विक्रीचे दुकान चालवतात. शिवाय मशरुम, पनीर इ. सारख्या वस्तुही विकतात. त्यांनी त्यांच्या भाजीपाला विक्री केंद्राचे नाव ‘आत्मनिर्भर’ ठेवले आहे. सुभाष यांच्या पत्नीही दिव्यांग असून, त्या अस्थिव्यंग आहेत.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

त्याही त्यांना व्यवसायात मदत करतात. त्यांना दोन अपत्य आहेत. त्यांच्या ७४ वर्षांच्या वडीलांच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. नुकतेच त्यांच्या एका भावाचेही पुण्यात निधन झाले. आता त्यांच्या कुटुंबाचेकर्ते पुरुष सुभाष हेच आहेत. ही सर्व जबाबदारी ते हसतमुखाने पार पाडत आहेत.

सुभाष यांचे शिक्षण बारावी (उत्तीर्ण) पर्यंत झाले आहे. व्यायामाची आवड असल्याने त्यांनी शरीरसौष्ठवात उत्तम यश संपादन केले. देशात अनेक ठिकाणी त्यांनी शरीरसौष्ठव स्पर्धा गाजवल्यात; त्यात अनेक पारितोषिकेही मिळविलीत. या आवडीमुळे त्यांनी मसाज थेरपीचा डिप्लोमाही केलाय. व्याधीग्रस्तांना ते मसाज करुन देत असतात.

हेही वाचा -  राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध होणार की शिक्षकांच्या संघटनांचे बळ !

म्हणूनच त्यांनी हा व्यवसाय निवडला. शहरातील एका जिममध्ये ते सेवा देतात. त्यावर त्यांची उत्तम गुजराण होत होती. तशातच कोरोनाची साथ आली. लॉकडाउन झालं. अनेकांच्या व्यवसायाप्रमाणे त्यांच्या व्यवसायावरही गदा आली. मसाज म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करणे अपरिहार्य असल्याने त्यांचा व्यवसाय जवळ जवळ बंद झाला. रिकामे राहून जगणे पसंद नव्हते. त्यांनी कुटुंबाच्या जबाबदारीचे पालन करण्यासाठी आणखी हातभार लागावा म्हणून भाजीपाला विक्री सुरू केली. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने त्यातून अधिकचे उत्पन्न ते मिळवू लागले.

संकटात स्वतः व कुटुंबालाही जपले
नेत्रहिन अवस्थेत हस्तस्पर्श हे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय समजले जाते. कोरोनाच्या प्रतिबंधात स्पर्शही टाळायचा आहे. तरी देखील आपली व आपल्या कुटुंबियांची जबाबदारी सांभाळून कुटुंबियांसह स्वतःला सुरक्षित ठेवणाऱ्या सुभाष यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. समाजातील सर्वच कुटुंबप्रमुखांनी सुभाष यांच्यासारखी जबाबदारी पालन करणे अपेक्षित आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Self-reliant disabled couple set an example, started a vegetable business