VIDEO: कौतुकास्पद; विद्यार्थी तयार करतात दिवे अन् पालकच बनतात ग्राहक

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 5 November 2020

दिवाळी सणात दिव्यांचे महत्त्व सर्वच जाणतात. आता वेगवेगळ्या आकर्षक पणत्या, दिव्यांना अधिक पसंती मिळते. हे दिवे बाजारातून विकत घेण्या ऐवजी तुमच्याच मुलांनी तयार केलेले असतील तर त्याचा आनंद अधिक ‘प्रकाशमय’ झाल्याशिवाय राहणार आहे.

अकोला :  दिवाळी सणात दिव्यांचे महत्त्व सर्वच जाणतात. आता वेगवेगळ्या आकर्षक पणत्या, दिव्यांना अधिक पसंती मिळते. हे दिवे बाजारातून विकत घेण्या ऐवजी तुमच्याच मुलांनी तयार केलेले असतील तर त्याचा आनंद अधिक ‘प्रकाशमय’ झाल्याशिवाय राहणार आहे.

याच उद्देशातून विद्यार्थ्यांना कार्यानुभवाचे धडे देण्यासाठी येथील न्यू खेताननगर कौलखेड परिसरातील ज्ञानदर्पण इंग्लिश स्कूल, माँ रेणुका मराठी प्राधमिक शाळा, अमृत कलश विद्यालयाने आगळावेगळा उपक्रम राबविला आहे.

कोरोना संकट काळात शाळा बंद असल्या तरी सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम शाळेच्या संस्थापिका पल्लवी संजय कुळकर्णी व संचालक संजय कुळकर्णी यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राबविला.

विद्यार्थ्यांनाही गटागटाने कोरोनाचे सर्व नियम पाळून या कार्यानूभव उपक्रमात कहभागी करून घेण्यात आले. तिन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनीयात सहभाग घेतला होता. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पणत्या तयार करणे, त्यांना रंग देण्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. माती तयार करण्यापासून ते चाकावर पणती तयार करण्यापर्यंतच्या अनुभावाचा विद्यार्थी आनंद घेतात.

सहा वर्षांपासून सातत्याने उपक्रम
विद्यार्थी व शिक्षकांच्या सहकार्याने सहा वर्षांपासून हा उपक्रम शाळेत राबविला जात आहे. यावर्षी कोरोना संकट बघता प्रत्यक्ष पणत्या तयार न करता मोठ्याप्रमाणावर विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी गुजरातमधून तयार पणत्या बोलावून त्यांना विद्यार्थ्यांतर्फे रंगरंगोटी करून घेण्यात आली. यावर्षी १६ हजार पणत्या बोलाविण्यात आल्यात. त्यापैकी आठ हजार पणत्यांच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे.

पालकच बनतात ग्राहक
शाळेत विद्यार्थ्यांना कार्यानुभव देताना तयार करण्यात आलेल्या पणत्यांचे ग्राहकही याच विद्यार्थ्यांचे पालक असतात. त्यामुळे शाळेच्या उपक्रमात पालकांचाही सहभाग असतो. पालकांकडून सहा वर्षांपासून या उपक्रमाला उत्स्फूर्त सहभाग मिळतो आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Students make Diwali lights and parents become customers