तर मंत्र्यांच्या घरात दिवाळी साजरी करू!, रविकांत तुपकर यांचा घणाघात; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी आक्रमक

शाहीद कुरेशी
Friday, 2 October 2020

शेतीपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतातच समाधी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी प्रशासनाने दिलेला शब्द पूर्णपणे पाळला नसून, अद्याप नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांना तातडीने भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्यांसह मुलाबाळांना घेऊन मंत्र्यांच्या घरात दसरा, दिवाळी साजरी करू, असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

मोताळा (जि.बुलडाणा) : शेतीपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतातच समाधी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी प्रशासनाने दिलेला शब्द पूर्णपणे पाळला नसून, अद्याप नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांना तातडीने भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्यांसह मुलाबाळांना घेऊन मंत्र्यांच्या घरात दसरा, दिवाळी साजरी करू, असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

वादळी वारा व संततधार पावसामुळे जिल्हाभरातील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व सहकाऱ्यांनी २३ सप्टेंबर रोजी परडा (ता.मोताळा) शिवारातील शेतात स्वतःला मानेपर्यंत जमिनीत गाडून घेत समाधी आंदोलन केले.

त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. प्रशासनाने तीन दिवसात पंचनामे संपवून शासनाला अहवाल देणार, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला नाही. शेतकऱ्यांना तातडीने भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्यांसह मुलाबाळांना घेऊन मंत्र्यांच्या घरात दसरा, दिवाळी साजरी करू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून दिला आहे.

राज्यात शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती आहे. मात्र राज्य व केंद्र सरकार एकमेकांवर केवळ आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. सत्ताधारी विरोधात असताना शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत मिळावी म्हणून ओरडत होते. आता सत्तेत असताना गप्प का, असा प्रश्न तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

सोयाबीन व कापसाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ व मराठवाड्यासह राज्यात रान पेटविणार आहे. दूध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर हे आंदोलन तीव्र असणार, असे तुपकर यांनी सांगितले. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात युवा नेते राजेश गवई यांनी ५० कार्यकर्त्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला.

यावेळी स्वाभिमानीचे प्रदीप शेळके, शेख रफिक, पवन देशमुख, महेंद्र जाधव, सय्यद वसीम, राजेश गवई, श्री मेढे, दत्ता पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

काळ्या कायद्यांची अंमलबजावणी होऊ देणार नाही
केंद्र सरकारने आणलेले तिन्ही कृषी विधेयक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आणणारे आहे. शेतकऱ्यांना सक्षम करून त्यानंतर खुल्या बाजारात उतरवले पाहिजे. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे दिसते. या काळ्या कायद्यांची अंमलबजावणी होऊ देणार नाही. त्यासाठी वेळप्रसंगी आरपारची लढाई लढू, असा निर्वाणीचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

स्वाभिमानी निवडणूकीच्या मैदानात उतरणार
मोताळा नगरपंचायतीची निवडणूक उंबरठ्यावर आली आहे. दरम्यान, शेतकरी व सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सतत अग्रेसर असते. मोताळा नगरपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामात स्वाभिमानी पक्ष सर्व ताकदीनिशी उतरणार आहे, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले. त्यामुळे मोताळा नगरपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: ... then lets celebrate Diwali in the ministers house !, Ravikant Tupkar beating; Swabhimani aggressive on farmers questions