esakal | लॉकडाउन विरोधात व्यापाऱ्यांचा उद्रेक!
sakal

बोलून बातमी शोधा

akola news Traders erupt against lockdown!

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभामुळे अकोला जिल्ह्यात ता. ५ ते ३० एप्रिल दरम्यान लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाविरुद्ध व्यापाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही उद्रेक बघावयास मिळाला.

लॉकडाउन विरोधात व्यापाऱ्यांचा उद्रेक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभामुळे अकोला जिल्ह्यात ता. ५ ते ३० एप्रिल दरम्यान लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाविरुद्ध व्यापाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही उद्रेक बघावयास मिळाला. अकोला शहरातील व्यापाऱ्यांनी ठिकठिकाणी धरणे देवून आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून लॉकडाउनचा निर्णय मागे घेत दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी प्रशासनाकडे रेटून धरली.


जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढतेच आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून ता. ५ एप्रिलपासून जीवनावश्य वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. गत वर्षभरापासून व्यवसाय कधी उघडे तर कधी बंद ठेवावे लागत असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे लॉकडाउनच्या निर्णयाविरोधात पहिल्या दिवसापासून व्यापाऱ्यांमध्ये रोष बघावयास मिळत आहे. लॉकडाउनच्या दुसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांचा या निर्णयाविरुद्ध मोठ्याप्रमाणावर उद्रेक बघावसाय मिळाला.
....................
नेकलेस रोडच्या व्यापाऱ्यांचे धरणे, मोर्चा
नेकलेस रोडवरील व्यापाऱ्यांनी बुधवारी (ता.७) लॉकडाउनच्या निषेधार्थ धरणे आंदोलन केले. त्यानंतर सिंधी व्यापारी संघटनेतर्फे वंचित बहुजन आघाडीचे नेते मनोहर पंजवाणी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात परिसरातील शेकडो कापड व इतर व्यापारी व त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये काम करणारे मजूर, कामगार सहभागी झाले होते. हा मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने मनोहर पंजवाणी यांनी जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करून दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा आम्ही लॉकडाउनचा निर्णय झुगारून दुकाने उघडू, असा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला. यावेळी व्यापारी चांगलेच आक्रमक झाले होते.

हेही वाचा - पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात
..........................
काला चबुतरा परिसरातील व्यापारी धडकले जिल्हाकचेरीवर
काला चबुतरा परिसरातील व्यापाऱ्यांनी सततच्या लॉकडाउनमुळे त्रस्त होत बुधवारी दुपारी १२ वाजतानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. लॉकडाउनमुळे होणारे किरकोळ व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. जिल्हा प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी व्यापाऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
........................................
शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
लॉकडाउन संदर्भात व्यापाऱ्यांचा उद्रेक होताना दिसत आहे. जिल्हाभर व्यापारी प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करून रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांची ही व्यथा शासनाकडे मांडण्याचे आश्वासन निवेदन व मोर्चा घेवून जिल्हा कचेरीवर धडकलेल्या व्यापाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात शासनाकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.
.............................
कामगारांचा प्रतिष्ठानांपुढे ठिय्या
लॉकडाउनने जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रतिष्ठाने मंगळवार (ता.६)पासून बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काम नाही, वेतन नाही हे धोरण स्वीकारले. परिणामी हजारो कामगार व मजुरांच्या हाताला कामच शिल्लक राहिले नाही. लॉकडाउन मागे घेवून दुकाने उघडली जातील व आपल्याला काम मिळेल, या आशेपोटी हे कामगार प्रतिष्ठांनांपुढे दिवसभर ठिय्या देवून बसलेले दिसतात. भर उन्हात प्रशासनाकडून निर्णय मागे घेतला जाईल, या आशेपोटी हे कामगार कोरोना विषाणू संसर्गाची कोणतीही भिती न बाळगता दिवसभर गटा-गटाने बाजारपेठ बसलेले दिसतात.
......................
रस्‍त्यावरील गर्दी कायम
फळ, भाजी विक्रेत्यांसोबतच हॉटेल, किराणा दुकाने उघडी असल्याने शहरातील रस्त्यावरील गर्दी बुधवारी कायम होती. त्यामुळे कोरोना विषाणूची चेन तोडण्याच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा जिल्हा प्रशासनाच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम कुठेतरी होताना दिसत आहे.
.........................
प्रशासनाकडून कारवाई सुरू
जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनचा निर्णय जाहीर केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळात इतर कोणतेही प्रतिष्ठाने उघडे दिसल्यास कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे एकीकडे व्यवसाय बुडाल्याने त्रस्त व्यापारी प्रशासनाच्या कारवाईनेही धास्तावले आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)

loading image