esakal | गरजवंतांच्या घरातही पडतील दिवाळीच्या प्रकाशाची दोन किरणे
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Two rays of Diwali light will fall on the homes of the needy

दिप कळीका धाकुटी, जे बहू प्रकाशाते प्रगटी, तैसी सद्‍बुद्धी थेकुटी म्हणो नये’ या संत वचनाप्रमाणे निराधार आणि गरजवंतांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटविण्याचे काम जागर फाऊंडेशन ही सामाजिक संस्था अनेक वर्षांपासून करीत आहे.

गरजवंतांच्या घरातही पडतील दिवाळीच्या प्रकाशाची दोन किरणे

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला ः ‘दिप कळीका धाकुटी, जे बहू प्रकाशाते प्रगटी, तैसी सद्‍बुद्धी थेकुटी म्हणो नये’ या संत वचनाप्रमाणे निराधार आणि गरजवंतांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटविण्याचे काम जागर फाऊंडेशन ही सामाजिक संस्था अनेक वर्षांपासून करीत आहे.

गतवर्षी भामरागड येथील पूरपीडितांना 100बैल शेतीच्या कामासाठी भेट देण्यात आले होते. रद्दी संकलनाच्या माध्यमातून त्यांनी घरोघरी जाऊन आत्तापर्यंत समाधानकारक रद्दी संकलीत केली आहे. मात्र, त्यांच्या या सामाजिक कार्यात आपलेही दोन हात पडावे, अशी इच्छा असणाऱ्यांसाठी त्यांनी निराधारांच्या दिवाळीकरीता रद्दी दान करण्याचे आवाहन केले आहे.


‘दिवाळीसण मोठा नाही आनंदाचा तोटा’असे आपण म्हणत असलो, तरी अनेक घरांत दिवाळीच्या दिवशीही साधा दिवा लागत नाही. आपण नव्या कोऱ्या कपड्यांमध्ये मिरवत असताना अनेक ठिकाणी विपरीत परिस्थिती असते.


गरजूंच्या घरातही दिवाळीच्या प्रकाशाची एक-दोन किरणे पडावीत, या हेतूने जागर फाऊंडेशन सामाजिक संस्था गत काही वर्षांपासून रद्दी गोळा करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करीत आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमधील मुलांना खाऊ, कपडे, शैक्षणिक साहित्य व निराधार महिलांना उदरनिर्वाहासाठी पिठाची चक्की भेट म्हणून देण्यात येणार आहे. आपण दिवाळी उत्साहात साजरी करीत असताना यंदाही हा उपक्रम राबवण्यात येत असून, त्यासाठी रद्दी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


यापूर्वीही ‘जागर’च्यावतीने दरवर्षी दिवाळीला रद्दी गोळा करून गरजवंतांना मदत करण्यात आली. गरजवंतांना पुरेशी मदत मिळत नसल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये या दिवाळीत लावण्याचा प्रयत्न जागर फाऊंडेशन करीत आहे. या सामाजिक कार्यात मदत करण्याची इच्छा असणाऱ्यांनी  इकबाल हुसेन (निंबा, बाळापूर) 8459367001,  तुलसीदास खिरोडकार (तेल्हारा) 9970276582, सुधीर फुलके (खडकी, अकोला) 9881292965, समीर शिरवळकर (रामदास पेठ, अकोला) 9922516175, अनंत देशमुख (उमरी, अकोला) 8208994017, संजय उंबरकार (जिल्हा परिषद परिसर) 9404092341, नंदकिशोर चिपडे (कौलखेड, अकोला) 9511789552 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


नकोशी असलेली रद्दी गरजवंतसाठी ठरणार आशेचा दिवा
दिवाळी सण येताच घराघरांत साफसफाई अभियानास प्रारंभ होतो. अशावेळी घरातील रद्दी प्रत्येकासाठी नकोशी असते. मात्र, हीच कवडीमोल रद्दी अनेकांकडून गोळा करून एक निधी उभा होतो त्यातून काहींची दिवाळी प्रकाशमान करता येते. समाजातील शेकडो निराधार, अनाथांची दिवाळी यंदा उजळण्यासाठी आपणही पुढाकार घेऊन आपल्या घरातील रद्दी संस्थेला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)