esakal | विश्वगंगाने तोडला गाव, वस्तींचा संपर्क
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News Vishwaganga river breaks village, contact of settlement

उन्हाळ्यात सुरू करण्यात आलेल्या टाकरखेड गावाजवळील विश्वगंगेच्या पात्रातील पुलाच्या कामाला लॉकडाउनचे ग्रहण लागले. पूल तर झालाच नाही सोबतच दुसरा मार्ग काढण्याचे प्रयत्नही होऊ न शकल्याने टाकरखेड परिसरातील विश्वगंगेच्या दुथळीभरून वाहणाऱ्या प्रवाहातूनच ये-जा करावी लागत आहे. टाकरखेडमधीलच विजयनगर तसेच माथेपुर गावाचा संपर्क एक महिन्यापासून तुटला आहे.

विश्वगंगाने तोडला गाव, वस्तींचा संपर्क

sakal_logo
By
एकनाथ अवचार

नांदुरा (जि.अकोला) : उन्हाळ्यात सुरू करण्यात आलेल्या टाकरखेड गावाजवळील विश्वगंगेच्या पात्रातील पुलाच्या कामाला लॉकडाउनचे ग्रहण लागले. पूल तर झालाच नाही सोबतच दुसरा मार्ग काढण्याचे प्रयत्नही होऊ न शकल्याने टाकरखेड परिसरातील विश्वगंगेच्या दुथळीभरून वाहणाऱ्या प्रवाहातूनच ये-जा करावी लागत आहे. टाकरखेडमधीलच विजयनगर तसेच माथेपुर गावाचा संपर्क एक महिन्यापासून तुटला आहे.


शेंबा, टाकरखेड व पंचक्रोशीतील गावांना मलकापूरसाठी जाणारा जवळचा रस्ता टाकरखेड ते तालखेड होय. याच रस्‍त्यावर टाकरखेड गावाजवळ विश्वगंगेच्या नदीपात्रावर पुलाचे काम सुरू आहे. कोरोना संसर्ग काळात पुलाचे काम बंद झाले. त्यात पर्यायी रस्ताही नाही. विश्वगंगेवरील पलढग धरण ओव्हरफ्लो झाले. पात्रातून कमरेपर्यंत पाणी वाहत आहे. त्यामुळे विजयनगर व माथेपूर या वस्ती गावांचा संपर्क तुटला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून नदी पात्रातून प्रवास करावा लागत आहे. याच रस्त्यावर डोलखेड गावाच्या जवळ दळाच्या नाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. तेही रखडलेल्या अवस्थेत असल्याने काढून दिलेल्या रस्त्यातील चिखलातून जनतेला पूर्ण पावसाळा भर वाट शोधावी लागत आहे.

पर्यायी मार्गच नाही
कोणत्याही पुलाचे बांधकाम करत असताना अगोदर वाहनांना किंवा प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग काढणे आवश्यक असते. विश्वगंगा नदी व दळाच्या नाल्यावर पुलाचे काम सुरू करताना याकडे दुर्लक्ष झाले. वरिष्ठ अधिकारीही याबाबत मूग गिळून असल्याने जनतेला कमरेपर्यंतच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

नदीपात्रात पाईप टाकून गैरसोय टाळणे शक्य
नदीपात्रात पाईप टाकून हा मार्ग काही अंशी सुरू होऊ शकतो. संबंधित विभागाने विश्वगंगा नदीपात्रात चार ते पाच पाईप टाकून पाणी काढून दिले तर थोडाफार का होईना हा रस्ता पूल होईपर्यंत सुरू होऊ शकतो. कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने जनतेला नाहक वेठीस धरले जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)