सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर उदय नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 23 September 2020

सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर उदय नाईक यांचेही आज हृदयविकाराच्या  झटक्याने निधन झाले.  गेल्या काही दिवसांपासून ते खासगी रुग्णालयात कोरोना सोबत झुंज देत होते.

अकोला:  अकोला जिल्हय़ात गत दोन महिन्यांपासून करोना संसर्ग सातत्यपूर्ण वाढला. शहरातील बहुतांश परिसर व्यापून घेतल्यानंतर ग्रामीण भागातही करोना वेगाने पसरतो आहे. अकोल्यात ७ एप्रिलला करोनाने शिरकाव केला, तर १३ एप्रिल रोजी शहरात पहिला बळी गेला.

अगोदर परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात असताना मे व जूनमध्ये रुग्ण व मृत्यू संख्या झपाटय़ाने वाढली. २८ एप्रिलपासून सुरू झालेली रुग्ण वाढीची मालिका अद्यापही अखंडित आहे. त्यातच दुर्दैव म्हणजे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढत गेले. गेल्या १२ दिवसांपासून सलग मृत्यू होत आहेत. 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

दरम्यान, सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर उदय नाईक यांचेही आज हृदयविकाराच्या  झटक्याने निधन झाले.  गेल्या काही दिवसांपासून ते खासगी रुग्णालयात कोरोना सोबत झुंज देत होते.

मध्यन्तरी त्यांचे कोरोनाने निधन झाले,अशी अफवा समाज माध्यमातून पसरली होती. मात्र,त्यांच्या निकटवर्तीयांनी समोर येवून डॉक्टरांच्या उपचार बद्दल माहिती दिली होती. डॉ.नाईक यांच्या तब्येतीत सुधारणाही झाली होती.उपचाराला चांगला प्रतिसाद देत होते. आज मात्र,दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान,त्यांच्या पत्नी भावना उदय नाईक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. डॉक्टर उदय नाईक यांची प्रकृती सुद्धा गंभीर होती. त्यांच्यावर अकोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते .  

श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे डॉ.उदय नाईक ,पत्नी भावना नाईक , मुलगा डॉ.प्रथमेश उर्फ मानस नाईक, आणि त्यांचे सासरे सुधाकर दीक्षीत यांना  ओझोन हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते.

गंभीर अवस्थेत उपचार सुरू असताना भावना नाईक यांचे शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुदैवाने निधन झाले. त्यांच्यावर त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केवळ डॉ. मानस यांची प्रकृती थोडी ठीक होती.

त्यामुळे अंत्यसंस्काराचे वेळी डॉ.प्रथमेश उर्फ मानस यांना ऑक्सीजन पुरवठ्यासह मोक्षधामावर आणण्यात आले होते. डॉ. उदय नाईक यांची प्रकृती  तेंव्हा चिंताजनक होती, त्यामुळे त्यांना पत्नीला  शेवटचे पाहता आले नव्हते.

दरम्यान नाईक परिवाराच्या तिघांवर शर्तीचे उपचार सुरू होते. डॉ.प्रथमेश उर्फ मानस आणि वयोवृध्द सासरे सुधाकर दीक्षित ठणठणीत झाल्याने दोघांना  सुखरूप घरी पाठविण्यात आले. 

डॉ.उदय नाईक यांना पुरविला जात असलेला कृत्रीम आक्सीजनचा पुरवठाही काढण्यात आला होता ते देखिल धोक्याबाहेर होते. परंतू काल त्यांचे स्वास्थ्य परत बिघडले होते.त्यांच्याकरिता प्लाझ्मा डोनरचा देखील शोध करण्यात येत होता.यासंदर्भात   आवाहनही केले होते.

होमिओपॅथीच्या शोधल्या विविध उपचार पध्दती
डॉक्टर उदय नाईक यांनी होमिओपॅथीच्या विविध उपचार पद्धती शोधल्या होत्या.आधुनिक उपचार पध्दतीही शहरात आणल्या. आळशी प्लॉट येथे त्यांनी भव्य नाईक हॉस्पिटल त्यांनी उभारले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Well known homeopathy doctor Uday Naik dies of heart attack