हिवरखेड येथील महिलेची रुग्णवाहीकेतच प्रसूती, चिमुकल्या बाळाला घेऊन नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात व्यक्त केला रोष

धीरज बजाज
Saturday, 18 July 2020

हिवरखेड येथे गुरुवारी रात्री एका गर्भवती महिलेला पोटात दुखू लागल्याने तात्काळ आरोग्यवर्धिनी केंद्रात नेण्यात आले. परंतु रात्रीच्यावेळी डॉक्टर हजर नसल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी रक्तदाब चेक करून त्यांना अन्यत्र रेफर केले. 

हिवरखेड  (जि.अकोला) :  हिवरखेड येथे गुरुवारी रात्री एका गर्भवती महिलेला पोटात दुखू लागल्याने तात्काळ आरोग्यवर्धिनी केंद्रात नेण्यात आले. परंतु रात्रीच्यावेळी डॉक्टर हजर नसल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी रक्तदाब चेक करून त्यांना अन्यत्र रेफर केले. 

108 रुग्णवाहिकेतून महिलेला अकोट येथे दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच अडगाव पूर्वी महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. त्यामुळे रुग्णवाहिकेला अडगाव आरोग्यवर्धिनी केंद्रात नेण्यात आले.  मात्र अडगाव येथे सुद्धा डॉक्टर हजर नव्हते. या सर्व प्रकारामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी नवजात बाळाला घेऊन मातेसह नातेवाईकांनी हिवरखेड आरोग्यवर्धिनी केंद्रात येऊन आपला रोष व्यक्त केला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

हिवरखेड येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात अनेक वर्षांपासून डॉक्टरांची कमतरता असल्याने आणि इतरही अनेक पदे रिक्त असल्याने फक्त एका महिला डॉक्टरवर हजारो रुग्णांचा भार पडलेला आहे. 

ज्या आरोग्यवर्धिनी केंद्रात कमीत कमी तीन डॉक्टर हवे असतात तेथे डॉ.वैशाली ठाकरे ह्या एकमेव डॉक्टर मोजक्या कर्मचार्‍यांसह आरोग्यवर्धिनी केंद्राचा डोलारा सांभाळत आहेत. वैद्यकीय अधिकारी पदाचा प्रभार डॉक्टर नंदकिशोर चव्हाण यांच्याकडे असून त्यांच्याकडे अडगावची मुख्य जबाबदारी असल्याने ते हिवरखेड येथे वेळ देण्यास असमर्थ ठरतात.

अनेक वर्षांपासून पर्याप्त डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी असतानाही दोन दिवसात डॉक्टर उपलब्ध होईल चार दिवसात डॉक्टर उपलब्ध होईल. अशा आश्वासना खेरीज नागरिकांना काहीच मिळाले नाही. 

आता तरी डॉक्टर द्या हो सरकार!
आज पर्यंत झाले ते झाले परंतु आता हिवरखेड आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण निघाले असून सरकारने आणि आरोग्य विभागाने येथील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हिवरखेड आरोग्यवर्धिनी केंद्रात पर्याप्त डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करावी. तसेच अतिरिक्त 108 रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रात पुरेशे डॉक्टर व कर्मचारी नाहीत इतरही समस्या आहेत परंतु येथे स्वतःचा गाजावाजा करण्यासाठी अनेकांच्या नावाच्या बोर्डांची भरमार असून त्यांना नागरिकांच्या आरोग्याशी काहीच घेणे देणे दिसत नाही.
- अमोल ढोले, रुग्णाचे नातेवाईक, हिवरखेड.

(संपादन- विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news A woman from Hivarkhed gave birth in an ambulance and relatives took her baby to the health center.