Video : अधिकाऱ्यांच्या तुघलकी कारभाराचा वाचला बच्चू कडू यांच्यापुढे पाढा, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील विहिर बुजविण्याचा लघू पाटबंधारे विभागाने दिला आदेश

मनोज भिवगडे 
Wednesday, 22 July 2020

कायम दुष्काळी गाव असलेल्या मासा-सिसा उदेगावला पाणीपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत खोदण्यात आलेली विहिर बुजवण्याचा आदेश देणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तुघलकी कारभाराचा पाढा गावकरी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.22) पालकमंत्री बच्चू कडू यांच्यापुढे वाचला.

अकोला  ः कायम दुष्काळी गाव असलेल्या मासा-सिसा उदेगावला पाणीपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत खोदण्यात आलेली विहिर बुजवण्याचा आदेश देणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तुघलकी कारभाराचा पाढा गावकरी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.22) पालकमंत्री बच्चू कडू यांच्यापुढे वाचला.

जिल्ह्यातील राजकारण आणि अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीमुळे एकीकडे एक न्याय व दुसरीकडे दुसऱ्या न्यायाने कारभार केला जात आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत मासा-सिसा उदेगावला पाणीपुरवठा करण्यासाठी विहिर खोदण्यात आल्यानंतर ती विहिर लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या 200 मीटर क्षेत्राच्या आत असल्याचे सांगून लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी सरपंच्यावर गुन्हे दाखल केले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कार्यकारी अभियंता वाकोडे यांच्या आदेशाने विहिर बुजवल्यास शासनाचे 55 लाख पाण्यात जाणार असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. शिवाय गावकऱ्यांना पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, हे वेगळेच. विशेष म्हणजे, या विहिरीपेक्षाही चार मीटर आत 25 वर्षे जुनी विहिर असून, ती सध्याही वापरात आहे. त्याबाबत कोणताही निर्णय विभागाने घेतला नाही. यावरून एकीकडे एक व दुसरीकडे दुसरा न्याय अधिकारी लावत असल्याचे गावकरी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष सतिष फाले, पंकज साबळे यांच्यासह गावकरी, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री करणार स्वतः पाहणी
पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे जलसंधारण मंत्रालयाचे राज्यमंत्रीपदही आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालत विहिरीची जागा बघण्यासाठी येण्याचे आश्‍वासन दिल्याचे मनसेचे तालुकाध्यक्ष सतिष फाले यांनी सांगितले. शिवाय सरपंचावर दाखल करण्यात आलेले गुन्हेही तातडीने मागे घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

अंतर्गत राजकारणाचा गावकऱ्यांना मनःस्ताप
जिल्ह्यात भाजपमध्ये असलेल्या अंतर्गत मतभेदाचा मनःस्ताप गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मासा-सिसा उदेगावला पाणीपुरवठा करण्यासाठी विहिर मंजूर करून देण्यासाठी माजी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला होता. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे हे काम करण्यात आले. गुन्हे मात्र सरंपचावर दाखल करण्यात आले. एकूणच राजकीय डावपेचात ग्रामस्थ मात्र चांगलेच भरडले जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola officials read Tughlaq's case to Bachchu Kadu, Minor Irrigation Department orders filling of wells in National Drinking Water Program