अकाेला : मोबाईलचा अती वापर शरीरासाठी घातक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola over use of mobiles is dangerous for body

अकाेला : मोबाईलचा अती वापर शरीरासाठी घातक

रिसोड : हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण मोबाईल वापरत आहेत. हल्ली मोबाईलचा वापर देखील वाढला आहे म्हणूनच सकाळी डोळे उघडताच आपल्यापैकी अनेकजण मोबाईलचा वापर करतात. परंतु याचे विपरीत परिणामसुद्धा भविष्यात उद्भवू शकतील.

स्मार्टफोनचा वापर एक सवय नाही तर व्यसन बनले आहे. अनेकजण असे सुद्धा आहेत की, जे रात्री झोपताना आपल्याजवळ स्मार्टफोन घेऊन झोपतात आणि सकाळी उठल्यावर झोपेतून पहिल्यांदा मोबाईल चेक करतात, अशा लोकांची सुद्धा संख्या कमी नाहीये. तसे पाहायला गेले तर स्मार्ट फोन व मोबाईलवर जास्त प्रमाणात अवलंबून राहणे हे आपल्यासाठी चांगले नाही.

जर तुम्हाला सुद्धा सकाळी झोपेतून जागे झाल्यावर मोबाईल वापरण्याची सवय असेल तर ही सवय भविष्यात घातक ठरू शकते. या सवयीमुळे तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेली आहे, असे एका संशोधनात सिद्ध झाले आहे.

मेसेज, ईमेल, रिमाइंडर, इंस्टाग्राम पोस्ट इत्यादी सगळ्यांच्या नोटीफिकेशन आपल्याला स्क्रीनवर दिसतात, जे चिंता आणि तणावाचे कारण ठरू शकते. झोपेतून जागे झाल्यावर जर आपण सोशल मीडिया चेक करतो तेव्हा आपला मेंदू सोशल मीडियावरील वेगवेगळ्या माहितीमुळे व्यस्त होऊन जातो. अशातच आपल्या दिवसाची सुरुवात तनाव आणि चिंता ग्रस्त दर्शविणाऱ्या बातम्या किंवा घटनाद्वारे होते. अशा प्रकारची चिंता व ताणतणाव आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

अति मोबाईलचा वापर हा शरीरासाठी घातक असून कामाशिवाय मोबाईल वापरणे टाळावे

- डॉ. समीर काळे , रिसोड