Five accused rigorous imprisonment
Five accused rigorous imprisonment

अकोला : जीवघेणा हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा

फिर्यादींना प्रत्येकी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश

अकोला - विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ डी. बी. पतंगे साहेब यांनी आरोपी पुरुषोत्तम दयाराम गाडगे, संतोष दयाराम गाडगे, उमेश दयाराम गाडगे, गोपाल श्रीराम गाडगे व खंडू भाऊराव गाडगे (सर्व रा. टाकळी खोजबळ, तालुका बाळापूर) यांना भादंवि कलम १४७, १४८, ३०७, ५०४, ५०६, ४५० सह कलम १४९ अंतर्गत दोषी ठरवून शनिवारी सहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

न्यायालयीन सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार या प्रकरणातील फिर्यादी प्रवीण काशीराम साबे यांच्या परिवाराचे व आरोपींचे जागे बाबत वाद सुरू होते. फिर्यादीचे वडील काशीराम साबे यांनी आरोपींच्या विरोधात उरळ पोलिस स्टेशन येथे २६ मे २०१५ व २९ मे २०१५ रोजी तक्रार सुद्धा दाखल केल्या होत्या. दरम्यान याच कारणावरून ३० मे २०१५ रोजी सर्व आरोपींनी फिर्यादी प्रवीण यास त्यांचे घरासमोर लोखंडी पाईप, काठ्यांनी मारहाण केली व त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी प्रवीण याला सोडून सर्व आरोपी फिर्यादीच्या घरी गेले.

सदर ठिकाणी आरोपींनी रिपोर्ट का दिला या कारणावरुन फिर्यादीचा भाऊ सचिन यास लोखंडी पाईप, काठ्यांनी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि कुळात दिवा ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे या प्रकरणी सर्व आरोपीच्या विरोधात उरळ पोलिस स्टेशन येथे भादंवि कलम १४७, १४८, ३०७, ५०४, ५०६, ४५० सह कलम १४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार पी.के. काटकर यांनी केला व तपास पूर्ण झाल्यावर आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध होण्यासाठी एकूण आठ साक्षिदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले व विविध कलमांन्वये शिक्षा ठोठावली. तसेच जखमी प्रवीण व सचिन साबे यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई आरोपींनी द्यावी असा आदेश सुद्धा केला. सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील आशीष आर. फुडकर व श्याम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

अशी ठोठावली शिक्षा

  • आरोपींनी भादंवि कलम १४७, १४८, ३०७, ५०४, ५०६, ४५० सह कलम १४९ अंतर्गत दोषी ठरवून कलम १४७, १४८ सहकलम १४९ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने सश्रम कारावास.

  • कलम ३०७ सहकलम १४९ अंतर्गत ६ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षे सश्रम कारावास.

  • कलम ५०४ व ५०६ सहकलम १४९ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महीने सश्रम कारावास.

  • कलम ४५० सहकलम १४९ अंतर्गत ४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com