शाळाबंद, स्कूलबसेसची चाके रुतलेलीच!, स्कूलबस व्यावसायिकांवर नैराश्याचे सावट

महादेव घुगे
Thursday, 13 August 2020

शासनादेशानुसार अद्याप शाळांना परवानगी मिळालेली नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूलबस चालक-मालक अडचणीत आले आहेत. उत्पन्नाचे साधन म्हणून मोठे कर्ज घेत स्कूलबस खरेदी केलेल्या बसमालकांनी उत्पन्न होत, नसल्याने गाड्या दारासमोर उभ्या केल्या आहेत.

रिसोड (जि.वाशीम) ः शासनादेशानुसार अद्याप शाळांना परवानगी मिळालेली नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूलबस चालक-मालक अडचणीत आले आहेत. उत्पन्नाचे साधन म्हणून मोठे कर्ज घेत स्कूलबस खरेदी केलेल्या बसमालकांनी उत्पन्न होत, नसल्याने गाड्या दारासमोर उभ्या केल्या आहेत.

बससाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी, या विवंचनेत मालकवर्ग आहेत. दुसरीकडे चालकवर्ग देखील वेतन नसल्याने मोठ्या अडचणीत आला आहे. पर्यायी नोकऱ्यादेखील उपलब्ध नसल्याने त्यांच्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कोरोनामुळे अनेकांचे आयुष्य अडचणीत आले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यात स्कूलबस चालक-मालकांचाही प्रश्न आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूलबसेस सज्ज असताना शाळाबंदमुळे त्यांच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्कूलबसेसची संख्या आहे. बहुतेक शाळांकडे स्वत:च्या स्कूलबसेस आहेत. त्यांनी चालकांना वेतनावर नेमलेले आहे.

दुसरीकडे अनेकांनी स्वत:ची बस खरेदी करून शाळांवर लावली आहे. काही मालक स्वत: तर काहींनी चालक ठेवलेले आहेत. मात्र सध्या शाळा बंद असल्याने या स्कूलबसेसची चाके अद्याप रुतलेलीच आहेत. यामुळे स्कूलबस मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने या वर्गाकडेही लक्ष देण्याची विनंती संबंधित व्यावसायिकांनी केली आहे.

कर्जफेड कशी? मालक अडचणीत
अनेकांनी उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून स्कूलबस व्यवसायाची निवड केली. यासाठी बँकांकडून मोठे कर्ज घेतले, आतापर्यंत सर्व ठिक होते. हप्ते वेळेवर भरले. परंतु कोरोनामुळे शाळा उघडण्यास परवानगी नसल्याने स्कूलबसेस देखील बंद ठेवाव्या लागल्या. परिणामी उत्पन्न होत नसल्याने हप्ते थकले आहेत. बँकांची कर्जफेड कशी करावी तसेच कुटुंब कसे चालावावे, असे मोठे प्रश्न स्कूलबस मालकांपुढे उभे ठाकले आहेत.

चालक पर्यायी नोकरीच्या शोधात
स्कूलबस मालकांप्रमाणेच चालकदेखील अडचणीत आले आहेत. मालकाकडून वेतन बंद झाल्याने तसेच टुरिझम बंद असल्याने इतर कुठेही त्यांना काम मिळेनासे झाले आहे. घर चालविणे गरजेचे असल्याने चालकवर्ग पर्यायी नोकरीच्या शोधात पायपीट करत असल्याचे चित्र आहे. नोकरी मिळत नसल्याने तसेच शिक्षण कमी असल्याने काही चालकांनी भाजीपाला व्यवसाय, काहींनी मातीकाम देखील स्वीकारले आहे. काहीजण गावी गेले असल्याची माहिती स्कूलबस मालक संतोष तालखेडकर यांनी दिली. कोरोनामुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर गडांतर आल्याने स्कूलबस चालकांसमोर घर चालविण्यासाठी यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Risod News School closed, schoolbuses wheeled !, Schoolbus professionals frustrated