बापरे! लहान मुलाच्या छातीवर, मांडीवर, मानेवर दिले इलेक्ट्रिक हिटरचे चटके, वाचा काय असेल कारण

संजय सोनोने
Thursday, 3 September 2020

एका चार वर्षीय चिमुकल्यास इलेक्ट्रिक हिटरचे चटके देऊन जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

शेगाव (जि.बुलडाणा ) : एका चार वर्षीय चिमुकल्यास इलेक्ट्रिक हिटरचे चटके देऊन जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

पोलीसांनी आरोपीस अटक करून त्याचे विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.
शहर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी मनोज सुरेश चिंचोळकार (वय ३१, रा.भोईपूरा) यांनी आरोपी महादेव सिताराम लांबे यांची जागा त्यांच्याकडून कायदेशीर खरेदी करून घेतली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मात्र त्यानंतर आरोपी याने फिर्यादीला पैसे कमी दिले असा राग मनात धरून १ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता सुमारास फिर्यादीचा ४ वर्षे वयाचा दर्शन नावाचा मुलगा हा आरोपीच्या घरासमोर खेळत असताना आरोपीने त्याला आपल्या घरी बोलावले व त्याच्या छातीवर, मांडीवर, मानेवर इलेक्ट्रिक हिटरचे चटके देवून गंभीररित्या जखमी करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान चिमुकल्याची आई घटनास्थळी आपल्या मुलास सोडविण्यास गेली असता आरोपीने तिलाही हिटरचे चटके दिले. अशा रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध कलम ३०७ भादंविनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ताले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलेश खंडारे हे करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Shegaon News Attempt to kill with the click of a heater