सलग तीन वर्ष दररोज आठ तास अभ्यास हेच अभिजीतच्या यशाचे रहस्य,  शेगावचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झेंडा

संजय सोनोने
Wednesday, 5 August 2020

सलग तीन वर्ष दररोज आठ तास अभ्यास करून अभिजीत सरकटेने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून तसेच जिद्द आणि जिकाटीच्या जोरावर त्याने यश खेचून आणले

शेगाव (जि.बुलडाणा) ः इलेक्ट्रॉनिक आणि  टेलिकम्युनिकेशनमध्ये बीई झाल्यानंतर मोठ्‍या कंपन्याद्वारे नोकरीसाठी सिलेक्शन झाले, परंतू खासगी नोकरी न करता समाजाचे ऋण फेडण्यासाठी केंदीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचे ठरवले. सतत तीन वर्ष यशाने हुलकावणी दिली. मात्र अभ्यासात सातत्य व जिद्द कायम ठेवली व अभिजीतची ‘जीत’ झाली. शेगावचा अभिजीत सरकटे हा विदर्भातील पहिला आयएएस ठरला आहे.

सलग तीन वर्ष दररोज आठ तास अभ्यास करून अभिजीत सरकटेने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून तसेच जिद्द आणि जिकाटीच्या जोरावर त्याने यश खेचून आणले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचे यश प्रेरणादायी आहे. अभिजीतचे वडील विश्वनाथ सरकटे वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे राज्य परीवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत तर आई मीना सरकटे शेगाव पंचायत समिती अंतर्गत लासूरा येथील शाळेत शिक्षिका आहेत. अभिजीतने शालेय शिक्षण शेगावात हरलालका शालेत व महाविद्यालयीन शिक्षण नगरपालिकेच्या महाविद्यालयात घेतले.

पुढे अमरावती येथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात बीईचे शिक्षण घेतले. विद्यार्थी दशेतूनच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा त्याचा मानस होता. याच दृष्टीने नंतर त्याने खासगी क्लासमधून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन घेतले. क्लासदरम्यान दिवसातून सलग आठ तास अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अपयश आल्यानंतरही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याची जिद्द कायम होती.

अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. पूर्णवेळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. २०१९ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून ७१० व्या अनुक्रमांकाने उत्तीर्ण होऊन अभिजीतने आपल्या स्वप्नांना मूर्तरुप दिले आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या किंवा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभिजीतने आदर्श निर्माण केला आहे. तीन वर्ष आलेल्या अपयशाने विचलित न होता, अभिजीने यूपीएससीतील यशाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले. परिपूर्ण अभ्यास, कठीण वाटणाऱ्या बाबींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन हेच यशाचे सूत्र असल्याचे अभिजीतने ‘सकाळ’ला सांगितले.

कौतुकाची थाप
विश्वनाथ सरकटे यांच्या मुलाने यूपीएससीत यश मिळवल्याची माहिती मिळताच राज्य परीवहन महामंडळातील कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला. राज्य परिवहन महामंडळाच्या परिवारातील मुलाने मिळवलेल्या यशामुळे आज अनेकांनी अभिजीतच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

जिद्द, परिश्रम व चिकाटी व अभ्यासातील सातत्यामुळे यश गाठता आले. सतत तीन वर्ष अभ्यास केला. नोकरी न करणयाचा निर्णय योग्य ठरला. स्पर्धा परीक्षेसाठी सातत्य आणि जिद्द कायम ठेवल्यास यश नक्कीच मिळते.
- अभिजीत सरकटे
(संपादन - विवेक मेतकर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Shegaon News Studying for eight hours every day for three years in a row is the secret of Abhijeet's success, Shegaon flag in Central Public Service Commission exams