
अकाेला : सहा महिन्यांत निघाले रस्त्याचे डांबर
शिरपूर जैन : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूर गावांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात येत आहेत. मात्र सदर कामे अत्यंत दर्जाहीन होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीचा पाढा वाढला आहे. वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत, जैन धर्मियांचे भगवान पार्श्वनाथाचे मंदिर जाणगीर महाराज संस्थान व हजरत मिर्झा मिया यांचा दर्गा अशा तीन धर्माचा त्रिवेणी संगम असलेले हे ऐतिहासिक गाव असून शेकडो वर्षापासून अस्तित्वात असलेले भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथाचे अधांतरी मूर्ती असलेले मंदिर, संपूर्ण भारतभरातील पर्यटकांचे व भाविक भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तर भगवान पार्श्वनाथाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातून भाविक भक्तांचा बाराही महिने येथे राबता असतो. अशा या त्रिवेणी संगम असलेल्या पावनभूमीत, वाशीम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद लाभलेल्या गावांमध्ये सध्या कोट्यवधी रुपयांच्या दर्जाहीन कामाचा राजकीय नेते व भ्रष्ट यंत्रणेच्या संगणमताने बोल बाला सुरू आहे. सध्या शिरपूर येथे भूमिगत नाली बांधकाम एक कोटी १४ लक्ष रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन गृह ५० लक्ष रुपये, शेतकऱ्यांसाठी चेतनागृह ३२ लक्ष रुपये तसेच शिरपूर ते वाघी रस्त्याचे डांबरीकरण काम, आई भवानी मंदिर ते जाणगीर महाराज बायपास रस्त्याचे डांबरीकरण व इतर अनेक विकास कामे सध्या करण्यात येत आहेत. मात्र त्या कामामध्ये कुठलेही नियोजन दिसून येत नाही.
काही दिवसापूर्वी करण्यात आलेले जगदंबा देवी संस्थान ते जाणगीर महाराज संस्थानकडे जाणाऱ्या बायपासचे डांबरीकरणचे काम करण्यात आले. या कामाचा तपशील दर्शविणारा फलक लावण्यात आला नाही. हे काम अत्यंत दर्जाहीन करण्यात आले असल्याची तक्रार येथील नागरिक व माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण भांदुर्गे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वाशीम यांना दिली. रस्त्याचे काम इतके सुमार दर्जाचे करण्यात आले की अवघ्या पंधरा दिवसात रस्त्यावर डांबर शिल्लक उरले नाही. एका पावसात डांबर निघून जाऊन जागोजागी खड्डे पडले आहेत. तक्रारदाराने डांबर कसे हाताने निघत आहे. याचा व्हिडिओ सुद्धा सामाजिक माध्यमांवर शेअर केला आहे. सदर दर्जाहीन कामामुळे संबंधित यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कमिशनच्या लालसेपोटी संपूर्ण यंत्रणाच भ्रष्ट झाल्याचे त्यानिमित्ताने मुद्दा उपस्थित होतो. सदर विकास कामाचा एवढा दर्जा खालावलेला असतांना संबंधित अभियंत्याने काम पूर्णत्वाचे प्रमाणात कसे दिले असेल असा प्रश्न निर्माण होतो. खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांनीच शिरपूरच्या विकास कामांकडे लक्ष द्यावे व या भ्रष्ट अभियंत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
Web Title: Akola Shirpur Gram Panchayat Bad Road Construction Asphalt Removed Six Months
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..