अरे हे काय ? फवारणीचा काळ अन् जनजागृतीचा दुष्काळ, विषबाधा टाळण्याचा प्रशासनाला पडला विसर

अनुप ताले 
Friday, 24 July 2020

खरिपातील सर्वच पिके आता वाढीच्या अवस्थेत असून, या दिवसात कीडी, रोगांचा प्रादुर्भावही जोर धरतो. त्यामुळे आता कीटकनाशकांच्या फवारणीवर शेतकऱ्यांचा जोर राहणार आहे. सोबतच कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या घटनाही पुढे येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती सुद्धा होणे गरजेचे आहे. परंतु, अजूनपर्यंत तसे होताना दिसूत नसून, प्रशासनाला जनजागृतीचा विसर पडल्याचे लक्षात येत आहे.

अकोला  ः खरिपातील सर्वच पिके आता वाढीच्या अवस्थेत असून, या दिवसात कीडी, रोगांचा प्रादुर्भावही जोर धरतो. त्यामुळे आता कीटकनाशकांच्या फवारणीवर शेतकऱ्यांचा जोर राहणार आहे. सोबतच कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या घटनाही पुढे येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती सुद्धा होणे गरजेचे आहे. परंतु, अजूनपर्यंत तसे होताना दिसूत नसून, प्रशासनाला जनजागृतीचा विसर पडल्याचे लक्षात येत आहे.

गेल्या तीन ते चार वर्षात ऋतूचक्रात परिणामी हवामानात वेळोवेळी आमुलाग्र बदल होत गेला. त्यामुळे सर्वच पिकांवर कीडी, रोगांचा प्रादूर्भाव वाढला. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्नही वाढले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या प्रयत्नातून तीव्र क्षमतेचे कीटकनाशक, तणनाशक शेतकऱ्यांनी वापरायला सुरू केले. मात्र, या रसायनांची फवारणी करताना, विषबाधा होऊन शेकडो शेतकऱ्यांचे तीन वर्षात बळी गेले. त्यावर उपाय म्हणून, विविध कीटकनाशकांवर बंदी लादण्यात आली तसेच विषबाधा बाधा टाळण्यासाठी सर्व स्तरावरून सुरक्षित फवारणी आणि कीटकनाशकांची हाताळणी याबाबत जनजागृती करण्याचे कार्य सुरू करण्यात आले.

यंदा मात्र जनजागृतीची मोहिम थंडबस्त्यात गेली आहे. सध्या कपाशी, तूर, हरभरा तसेच भाजीपाला, फळपिकांवर कीडी, रोगांनी आक्रमण सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा कीटकनाशकांची फवारणी सुरू केली असून, कीटकनाशकांच्या खरेदीलाही जोर आला आहे. परंतु, प्रशासनाकडून सुरक्षित फवारणी तसेच कीटकनाशक हाताळणीसंदर्भात जनजागृतीकडे दुर्लक्ष होत असल्याने, शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कीटकनाशके निवड व खरेदीवेळी घ्यावयाची काळजी

  • * कीटकनाशके खरेदीपुर्वी पिकांवर कोणती कीड/रोग आहे याची सर्वेक्षणाद्वारे खातरजमा करावी.
  • तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आवश्यक कीडनाशकांची खरेदीसाठी निवड करावी.
  • साठवणुकीमध्ये असलेली कीटकनाशके, पिकाची अवस्था, झालेली वाढ, क्षेत्र, विचारात घेऊन नेमकी तेवढीच कीटकनाशकांची मात्रा खरेदी करावी.
  • शिफारस केलेली कीटकनाशके नामांकित कंपनीची अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत.
  • मुदतबाह्य कीटकनाशके खरेदी करू नये. खरेदीची पक्की पावती घ्यावी कारण.
  • कीटकनाशक तयार केल्याची तारीख तसेच अंतिम मुदत तपासावी.
  • किरकोळ स्वरुपात खरेदी न करता संपुर्ण बाटली किंवा डबा खरेदी करावा.
  • कीटकनाशके खरेदी केल्यानंतर ती खाद्य पदार्थांसोबत एकत्र ठेऊ नये.
  • कीटकनाशके कुलूपबंद पेटीत, लहान मुलांपासून दूर ठेवावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी
प्लास्टीक बकेटमध्ये पाणी घेऊन, त्यात कीटकनाशक मोजून टाकावे. ढवळून एकजीव द्रावण तयार करावे. प्रत्येकवेळी पंपामध्ये द्रावण भरताना ते ठवळून घ्यावे. कीटकनाशक वापरण्यापूर्वी लेबल व माहिती पत्रक वाचून सूचना पाळाव्या. तणनाशके फवारणीचा पंप, कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना संरक्षक कपडे, बुट, हातमोजे, नाकावरील मास्क वापरावे. संरक्षक कपडे, बुट, हातमोजे व नाकावरील मास्क, पातळ कापड इत्यादीचा वापर करावा. उघड्या अंगाने फवारणी टाळावी, फवारणी करताना धुम्रपान, तंबाखूचे सेवन करू नये. फवारणी झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ करूनच भोजन करावे. विषबाधा झाल्यास, कीटकनाशकाचे माहितीपत्रकासह तत्काळ डॉक्टरांकडे जावे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola spraying season and awareness of drought, the administration forgot to avoid poisoning