
अकोला : वीटभट्टी व्यावसायिकांसाठी सुलभ नियमावली तयार करा; डॉ. राजेंद्र शिंगणे
अकोला : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेतला. डॉ. शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. शिंगणे यांनी जिल्ह्यातील वीटभट्टी व्यावसायिकांसाठी सुलभ नियमावली करुन त्वरित परवाना मिळेल यासाठी नियोजन करावे, असे दिले.
बैठकीत डॉ. शिंगणे पुढे म्हणाले की, वीटभट्टी व्यावसायिकांना आवश्यक परवाना सहज व त्वरीत मिळेल याकरीता प्रशासनाने उपाययोजना राबवावी. लोकप्रतिनिधींद्वारे राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांकरिता प्रशासनाने समन्वय राखावा, विधवा महिलांना पेन्शन, जिल्ह्यातील गुटखा व अवैध ड्रग विक्रीवरील कार्यवाही इत्यादी विषयाचा आढावा घेवून यासंदर्भात तातडीने उपाययोजना करावी.
बैठकीला विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा उपायुक्त पंकज जवजाळ, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सागर तेरकर, विनय सुलोचने, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, माजी आमदार हरिदास भदे, सामाजिक कार्यकर्ता आशा मिरगे आदी उपस्थित होते.
गुटखा माफिया विरोधात धाडसत्र राबवा
जिल्ह्यात चोरून लपून अवैध गुटखा विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे गुटखा माफियावर विशेष पथक निर्माण करुन धाडसत्र राबवावे. गुटखा विक्री बाबत गोपनीय माहिती देणाऱ्या खबरी व्यक्तींचे जाळे अधिक मजबूत करुन पोलिस प्रशासनाच्या मदतीने गुटखा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, असे निर्देश डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिले.
Web Title: Akola State Minister Food And Drug Administration Dr Rajendra Shingane Reviewed Various Issues In District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..