पहिल्या अपघातात वाचला...पण काळाने अखेर गाठलेच!

राम चौधरी 
Wednesday, 22 July 2020

म्हणतात ना की, काळ आला की तो कुठे आणि कसा गाठेल हे सांगता येत नाही. अशीच एक दुर्दैवी घटना कारंजा येथील एका व्यक्तीसोबत घडली. सकाळी अपघातात वाचले...पण काळाने अखेर त्यांना गाठलेच. रुगवाहिकेला झालेल्या अपघात त्यांच्यासह त्यांचे जावाईही ठार झाल्याची घटना मन हेलावून गेली.

वाशीम ः काळाने अखेरपर्यंत पाठलाग करून त्याला गाठले... पहिल्या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले तरी प्राणी वाचले...मात्र उपचारासाठी जात असताना रुग्णवाहिकेला अपघात झाला आणि त्यात अखेर त्यांचा मृत्यू झाला. सोबत असलेल्या जावाईसुद्धा ठार झाले आहेत. ही घटना हृदय हेलावून टाकणारी घटना मंगळवारी (ता.21) सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पातुर जवळील घाटात घडली.

याबाबत प्राप्त माहितीनुसार कारंजा तालुक्‍यातील गायवळ येथील वाल्मिक पाटील तुरक (वय 52 वर्षे) यांचा कारंजा येथे दुचाकीने अपघात झाला होता. त्यांना पुढील उपचारासाठी वाशीम येथे दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे नेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला होता.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यावरून वाशीम येथील जोगदंड यांच्या रुग्णवाहिकेमध्ये जखमी वाल्मिक तुरक व त्याचे पाच नातेवाईक अकोल्याकडे निघाले होते. पहिल्या अपघातात वाचल्यानंतर त्यांचे प्राण वाचविण्यासाठी रुग्णवाहिका वाऱ्याच्या वेगाने अकोल्याकडे धावत होती. मागे काळ त्यांचा पाठलाग करतोय याची पुसटशी कल्पनाही रुग्णवाहिकेतील लोकांना नव्हती.

जखमीला घेवून निघालेली रुग्णवाहिका अकोल्यापासून 50 किलोमीटर दूर असतानाच काळाने रुग्णवाहिकेला गाठले ते अकोला जिल्ह्यातील पातुर घाटात. घाटात अकोल्याकडून येणाऱ्या आयशर ट्रकची या रुग्णवाहिकेला जबर धडक बसली.

अपघात एवढा भीषण होता की, त्यात पहिल्या अपघातात वाचलेले व गंभीर जखमी झालेले वाल्मिक तुरक जागीच ठार झाले. सोबतच त्यांचे जावई चंद्रकांत बिटकर (वय 28) यांच्यावरही काळाने घाला घातला. रुग्णवाहिकेत सोबत असलेले नातेवाईक व इतर असे सहा जण गंभीर जखमी झालेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola survived the first accident ... but time has finally reached!