अकोला : तलाठ्यांच्या ‘असहकारा’मुळे दसरा अंधारात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

अकोला : तलाठ्यांच्या ‘असहकारा’मुळे दसरा अंधारात!

अकोला : संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाला १२३ कोटी ६२ हजार ८८ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. सदर निधी तहसिलदारांना वाटप करण्यात आला असला तरी तो मूर्तिजापूर तालुका वगळता इतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अद्याप जमा झाला नाही. सदर मदत निधी वाटप करण्यास तलाठ्‍यांनी नकार दिल्याने दसऱ्याच्या तोंडावर शेतकरी मदत निधीपासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.

जून, जुलै महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. बाळापूर व अकोला तालुक्यात पावसामुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. शेती पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूंग, उडीद, भाजीपाला या पिकांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. परिणामी शेती पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक त्यानंतर अंतिम अहवाल तयार करून शासनाला पाठवण्यात आला होता. त्यानुसार शासनाने शेती नुकसानीसाठी निधी मंजूर केला आहे. सदर निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्यानंतर निधी तहसिलदारांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. परंतु सदर निधी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा दसरा अंधारात असल्याचे दिसून येत आहे.

तलाठ्यांनी केला ऊहापोह

यासंदर्भात विदर्भ पटवारी संघाच्या बाळापूर उपविभागाच्या वतीने पातूर व बाळापूरचे तहसिलदर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध बाबींचा ऊहापोह करण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्ती उद्‍भवल्यास त्याबाबत ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून पंचनामा व इतर कामे करणे अपेक्षित आहे. परंतु दर्दैवाने क्षेत्रीय पातळीवर तसे होत नाही.

पिकांच्या नुकसानीसाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर सदर निधीतून बाधित शेतकऱ्यांना अनुज्ञेय रक्कम वाटप करण्याचे काम कृषी विभाग करेल असे स्पष्ट नमुद आहे. त्यामुळे हे काम कृषी विभागाने करावे.

यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या अनुदानाचा ०.२५ टक्के प्रशासकीय खर्च तलाठ्यांना अदा करण्यात यावा. वरील सर्व बाबींचा विचार करता वाटपाचे काम नाकारण्यात येत आहे, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

याद्या कोषागारात सादर

अकोला तालुक्यातील १५ हजार ६३२, बार्शीटाकळी तालुक्यातील ७९०, अकोट तालुक्यातील ५ हजार ६२०, तेल्हारा तालुक्यातील १ हजार ६१०, बाळापूर तालुक्यातील ४२ हजार ९९५ व मूर्तिजापूर तालुक्यातील ३ हजार ६८७ शेतकऱ्यांच्या याद्या यापूर्वीच कोषागारात सादर केल्या आहेत. त्यामुळे ६८ कोटी ३९ लाख ४४ हजारांची रक्कम शेकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा आहे.

इतर तालुके शून्य

जिल्ह्यात सात तालुक्यांपैकी केवळ मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत मिळाली आहे. त्यामुळे तीन हजार ४१४ शेतकऱ्यांच्या खात्यात दोन कोटी १७ लाख ६४ हजार रुपये जमा झाले आहेत. परंतु इतर तालुक्यात वाटप मात्र शून्य टक्के आहे.

तलाठ्‍यांच्या भूमिकेवर वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल. शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधीत सुद्धा लवकरच जमा होईल.

- प्रा. संजय खडसे निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटपाचे काम कृषी विभागाने करावे, असा शासनाचा आदेश आहे. याविषयावर राज्यस्तरावर सचिवांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्ह्यात सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यात आली. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा तलाठ्‍यांचा हेतू नाही, परंतु आमच्या मागण्या रास्त आहेत.

- नंदकिशोर माहोरे जिल्हाध्यक्ष, विदर्भ पटवारी संघटना, अकोला