Akola : TBमुक्त भारतासाठी राबविली जात आहे योजना ; ५० निक्षयमित्रांनी घेतले ६१ क्षयरुग्ण दत्तक

आरोग्य विभागाचा उपक्रम
TB Patinet
TB Patinetsakal

अकोला : उपचाराधीन क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना दरमहा कोरड्या आहाराचे पोषण किट पुरवून देशातून क्षयरोग हद्दपार करण्यात योगदान द्यावयाचे आहे. त्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘निक्षयमित्र’ हा उपक्रम सुरु केला आहे.

या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ५० निक्षयमित्रांनी ६१ क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे, विशेष म्हणजे यात आरोग्य विभाग व प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी दिली.

क्षयरुग्णांना ‘सामुदायिक सहाय्य’ हा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा उपक्रम आहे. याद्वारे क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळते. या उपक्रमाचा प्रारंभ राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी केला आहे. ह्या निक्षयमित्रांनी क्षयरुग्णांना सहा महिने ते तीन वर्षे कालावधीसाठी कोरडा आहार (निक्षय पोषण किट) पुरवायचे आहे.

जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी झालेत निक्षयमित्र

अकोला जिल्ह्यातील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा या उपक्रमात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात ६१ क्षयरुग्णांना ५० जणांनी निक्षयमित्र होऊन दत्तक घेतले आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कापशी येथील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले ह्यांनी अकोट येथील,

माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. करंजीकर यांनी बाळापूर येथील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी बार्शीटाकळी येथील, बोरगाव उपकेंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका बोराडे यांनी बोरगाव खु. येथील रुग्णास दत्तक घेतले असून ते आता ‘निक्षयमित्र’ बनले आहेत. त्याच प्रमाणे आरोग्य संजिवनी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेनेही क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे.

जिल्ह्यातील क्षयरुग्ण संख्या

अकोला जिल्ह्यात एकूण एक हजार ३५८ जणांची क्षयरुग्ण म्हणून नोंद आहे. त्यापैकी ७८९ जणांचे उपचार पूर्ण होऊन ते आता बरे झाले आहेत. सद्यस्थितीत ५६९ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४१० रुग्णांनी पोषण आहार किट घेण्यास संमती दर्शविली आहे.

क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट

निक्षयमित्रांनी क्षयरुग्णांना मोठ्या व्यक्तीकरिता- नाचणी/बाजरी/ ज्वारी/ गहू- तीन किलो, डाळ- दीड किलो, तेल-२५० ग्रॅम, शेंगदाणा/ दुधपावडर एक किलो तर लहान बालकांना- नाचणी/बाजरी/ ज्वारी/ गहू- दोन किलो, डाळ- एक किलो, तेल-१५० ग्रॅम, शेंगदाणा/ दुधपावडर ७५० ग्रॅम याप्रमाणे पोषण आहार किट दरमहा द्यावयाचे आहे. या पोषण आहाराचे उद्दिष्ट रुग्णाचे पोषण योग्य पद्धतीने होऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा होय. औषधोपचार सर्व शासकीय दवाखान्यांत मोफत असतातच.

निक्षयमित्र होण्यासाठी काय करावे?

जिल्ह्यातील अधिकाधिक व्यक्ती, संस्थांनी निक्षयमित्र व्हावे, असे आवाहन उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले आहे. त्यासाठी ‘कम्युनिटी सपोर्ट डॉट निक्षय डॉट ईन’ या लिंकवर जाऊन माहिती घ्यावी अथवा डॉ. मनिष शर्मा, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा स्त्री रुग्णालयामागील परिसर यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com