esakal | गुंडावर वॉच ठेवणारा तिसरा डोळा बंद,  शहरातील मुख्य चौकातील सीसी कॅमेरे बंद
sakal

बोलून बातमी शोधा

akola third eye on the hooligan is closed, the CCTV cameras in the main square of the city are closed

शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिकेसह पोलिस विभागाने गाजावाजा करीत शहरातील मुख्य चौकात व रस्त्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. संपूर्ण शहराकडे लक्ष ठेवणाऱ्या या डोळ्यांना मोतीबिंदू झाला असून, नेमके ऑपरेशन करणार कोण या वादात शहर आंधळ झाले आहे.

गुंडावर वॉच ठेवणारा तिसरा डोळा बंद,  शहरातील मुख्य चौकातील सीसी कॅमेरे बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिकेसह पोलिस विभागाने गाजावाजा करीत शहरातील मुख्य चौकात व रस्त्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. संपूर्ण शहराकडे लक्ष ठेवणाऱ्या या डोळ्यांना मोतीबिंदू झाला असून, नेमके ऑपरेशन करणार कोण या वादात शहर आंधळ झाले आहे.


महानगरपालिकेसह अकोला पोलिस विभागाने शहरातील महत्त्वाच्या स्टेशन चौक, अग्रेसन चौक, टॉवर, बसस्थानक, अशोक वाटीका, गांधी चौक येथे बसविलेले सीसी कॅमेरे देखभाल दुरूस्तीअभावी बंद पडले आहेत. कॅमेरे दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणाची यावरून वाद निर्माण झाला आहे. महानगरपालिकेने चार वर्षांपूर्वी शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसी कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे बसवून सर्व यंत्रणा पोलिसांकडे हस्तांतरित केली होती. त्यामुळे या कॅमेऱ्यावर पोलिसची निगराणी आहे. या कॅमेऱ्यावरून वाहतुकीची शिस्त बिघडविणाऱ्यांना दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच गंभीर गुन्ह्यात पळून गेलेल्या आरोपींचा याच कॅमेरा मार्फत तपास करून मुसक्‍या आवळण्यात पोलिसांना यश आले होते. असे असताना कॅमेऱ्यांची देखभाल व दुरुस्तीबाबत अनास्था दाखविली जात असून शहरातील बहुतांश कॅमेरे हे बंद पडल्यामुळे झालेला हा खर्च व्यर्थ झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. कॅमेरा बंद पडला की, महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला जात आहे. पोलिस कामाला सहकार्य म्हणून नगरअभियंता यांनी अनेकवेळा संगणक विभागाला कॅमेरे दुरुस्तीची सूचना केली आहे. पण आता याचा खर्च उचलायचा कोणी यावरुन दुरुस्ती रखडली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

ही आहेत कॅमेरे बंद पडण्याची कारणे
कॅमेरे बंद पडण्याची कारणे किरकोळ आहेत. वारा किंवा इतर धक्‍क्‍याने कनेक्‍शन तुटणे, वीजपुरवठा व्यवस्थित न होणे यामुळे प्रक्षेपण बंद पडते. दुरुस्तीसाठी पोलिसांकडून महापालिकेकडे पत्रव्यवहार होतो पण यावर आता नेमके पोलिस प्रशासन खर्च करेल की, महानगर पालिका याच कचाट्यात हा शहराचा तिसरा डोळा अडकला असून, काही अघटीत घटना घडली तर नेमके जबाबदार कोणाला धरायचे हे ठरवणे मुस्किल होणार एवढे मात्र निश्‍चित.

पोलिस विभागाचे 68 सीसी कॅमेरे
शहरात पोलिस विभागाकडून एकूण 68 सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी पोलिस विभागाची आहे आणि ती जबाबदारी पोलिस विभाग पार पाडत आहे. उर्वरीत कॅमेरे महानगरपालिकेने बसविलेले असून, त्याची जबाबदारी महानगरपालिकेकडे आहे.