अकोला : आषाढी एकादशीनिमित्त एसटी, रेल्वे सज्ज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola to pandharpur bus service ashadhi wari

अकोला : आषाढी एकादशीनिमित्त एसटी, रेल्वे सज्ज!

अकोला : विठ्‍ठलाच्या दर्शनासाठी व आषाढी यात्रेत सहभागी हाेण्यासाठी महाराष्ट्रासह परप्रांतातील वारकरी, भक्त पंढरपूरला जातात. हे लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाच्या वतीने पंढरपूर यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आषाढी एकादशी करीता अकोला मार्गे विशेष रेल्वे गाड्या प्रत्येकी सोडण्यात येतील. त्यामुळे स्थानिक वारकरी व भक्तांना त्याची सुविधा मिळेल.

साेलापूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी निमित्त माेठी यात्रा भरते. त्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील हजाराे वारकरी व भाविक भक्त सहभागी हाेतात. ही बाब लक्षात घेवून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वतीने विठ्‍ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर - मिरज आषाढी एकादशी स्पेशल रेल्वे गाडी (भुसावळ, दौंड मार्गे) सहा आणि नऊ जुलै रोजी नागपूर येथून सकाळी ८.५० वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात मिरज-नागपूर गाडी ८ व ११ जुलै रोजी रात्री दुपारी १५.५५ वाजता सुटेल. त्यासोबतच नागपूर-पंढरपूर विशेष गाडी सात व दहा जुलै रोजी नागपूर येथून ८.५० वाजता सुटेल व परतीच्या प्रवासात गाडी पंढरपूर येथून ९ व १२ जुलै रोजी सायंकाळी १७ वाजता सुटेल.

अमरावती-पंढरपूर गाडी सहा व सात जुलै रोजी नया अमरावती येथून सुटेल. परतीच्या प्रवासात पंढपूर येथून ७ व १० जुलै रोजी १९.१० वाजता सुटेल. याव्यतिरिक्त गाडी क्रमांक ०११२१ खामगाव-पंढरपूर गाडी सात व दहा जुलै रोजी खामगाव येथून ११.३० वाजता सुटेल तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०११२२ पंढरपूर-खामगाव गाडी ८ व ११ जुलै रोजी सकाळी ५ वाजता सुटेल.

असा मिळणार अकोला येथे थांबा

गाडी क्रमांक ०१११५ मिरज-पंढरपूर गाडी सहा व नऊ जुलै रोजी धावेल. ही गाडी १३.२७ वाजता अकोला रेल्वे स्टेशनवर पोहचेल व १३.३० वाजता रवाना होईल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१११६ मिरज-नागपूर विशेष गाडी आठ व ११ जुलै रोजी मिरज येथून सुटेल व ७.१० वाजता अकोला रेल्वे स्टेशनवर पोहचेल. गाडी क्रमांक ०१११७ नागपूर-पंढरपूर विशेष गाडी सात व दहा जुलै रोजी धावेल. ही गाडी अकोला रेल्वे स्टेशनवर १३.२७ वाजता पोहचेल व १३.३० वाजता रवाना होईल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१११८ पंढरपूर-नागपूर विशेष गाडी नऊ व १२ जुलै रोजी धावेल व अकोला येथे ७.१० वाजता पोहचेल, ७.१३ वाजता रवाना होईल.

गाडी क्रमांक ०१११९ नवी अमरावती-पंढरपूर विशेष गाडी सहा व नऊ जुलै रोजी धावेल. ही गाडी अकोला रेल्वे स्टेशनवर १६.२० वाजता पोहचेल व १६.३० वाजता रवाना होईल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०११२० पंढरपूर येथून आठ व ११ जुलै रोजी धावेल. अकोला येथे १०.०७ वाजता पोहचेल व १०.१० वाजता रवाना होईल.

एसटी दोनशे जादा गाड्या सोडणार

श्री क्षेत्र पंढरपूरसाठी एसटी महामंडळामार्फत दररोज सकाळी ९ वाजता अकोला बस स्थानकातून अकोला- पंढरपूर ही नियमित बस सेवा सुरू आहे. सदर बस अकोला, पातूर, मालेगाव, वाशिम, हिंगोली, परभणी, अंबेजोगाई, बार्शी मार्गे सायंकाळी पंढरपूरला पोहचते. त्यासोबतच अकोला विभागातील १३० गाड्या व गडचिरोली व चंद्रपूर याविभागतून ७० मागवण्यात येणार आहे, असे २०० गाड्यांचे नियोजन आहे. याव्यतिरिक्त परतीच्या प्रवासाठी पंढरपूर येथून अकोल्यासाठी अकोला विभागातर्फे बसेस सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ग्रुप बुकिंग साठी सदर गाड्या उपलब्ध आहेत.