
अकाेला : महानायकाच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी उपोषण
कारपा : राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द सांभाळून शेती व शेतीपूरक व्यवसायास चालना देणारे हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेच्या आवारातील त्यांच्या पुतळ्याची अवस्था दयनीय झाली आहे.
या पुतळ्याची दुरुस्ती व सौंदर्यीकरण करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यानी अनेक वेळा जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली. परंतु जिल्हा परिषद प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. त्यामुळे अखिल भारतीय तांडा सुधार समिती आणि विविध संघटनांच्या वतीने दिनांक १ जुलै या महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी शाळेच्या पटांगणातच आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना तहसीलदार मानोरा मार्फत देण्यात आले आहे. निवेदन देताना तांडा सुधार समितीचे तालुका अध्यक्ष डॉ. गणेश राठोड, डॉ. सुधाकर राठोड, प्रकाश चव्हाण, भुली धर्मराज आडे चिखली ही मंडळी उपस्थित होती. या आंदोलनाचे नेतृत्व रमेश महाराज, संजय महाराज करणार आहेत.
याबाबत दिलेल्या निवेदनानुसार ज्यांच्या नावाने राजकीय पोळी भाजून सत्तेत सहभागी होत मोठ्या अभिमानाने येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता गाजवित नाईक यांचे गुणगान केवळ जयंती-पुण्यतिथी व निवडणुकीच्या तोंडावर करणाऱ्या महाभागाचा हा निंदनीय प्रकार कुठेतरी थांबावा व जिल्हा परिषद प्रशासनाला जाग यावी. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याची दुरावस्था थांबावी तळागाळातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने तालुक्यातील शेतकरी बांधव व बंजारा बांधवांना कळविण्यात येते की, पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करून घेण्यासाठी दि. १ जुलै रोजी शाळेच्या आवारात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याने या आंदोलनात सहभागी व्हावे. सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व अ.भा. तांडा सुधार समितीच्या सर्व सदस्यांनी याची नोंद घेऊन आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. गणेश राठोड, डॉ. सुधाकर राठोड, रामराव चव्हाण माजी सरपंच देवठाणा वसंतराव नाईक मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन राठोड, महेश राठोड, विशाल राठोड यांनी केले आहे.
Web Title: Akola Vitholi Zilla Parishad School Vasantrao Naik Statue Bad Condition
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..