शिक्षकानेच दिली मुख्याध्यापकाच्या हत्येची सुपारी, माथेफिरूने झाडली गोळी; नेम चुकला गेम हुकला

राम चौधरी 
Saturday, 25 July 2020

अमानी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक विजय बोरकर यांच्यावर अमानी येथील २२ वर्षीय यूवकाने जिवे मारण्याच्या उद्देशाने शाळेच्या खोलीतच गोळी झाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.२४) सकाळी साडेदहा वाजता घडली.

मालेगाव  ः अमानी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक विजय बोरकर यांच्यावर अमानी येथील २२ वर्षीय यूवकाने जिवे मारण्याच्या उद्देशाने शाळेच्या खोलीतच गोळी झाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.२४) सकाळी साडेदहा वाजता घडली.

यामध्ये माथेफिरूचा नेम चुकविल्याने मुख्याध्यापक बचावले. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याने एका शिक्षकानेच मुख्याध्यापकाला मारण्याची सुपारी दिल्याची बाब कबूल केली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मालेगाव तालुक्यातील अमानी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील सत्रात मुख्याध्यापक पदी गजानन ईंगळे होते. त्यांच्या विरोधात शाळा समितीने तक्रार केल्याने प्रशासनाने त्यांच्याकडील मुख्याध्यापक पदाचा पदभार काढून तो विजय बोरकर यांच्याकडे दिला. त्यानंतर इंगळे यांनी बोरकर यांच्या विरोधात तक्रारी करणे सुरू केले. गुरूवारी (ता.२३) केंद्र प्रमुखांनी मुख्याध्यापक बोरकर यांना शुक्रवारी (ता.२४) येण्यास सांगितले होते.

त्यामुळे मुख्याध्यापक बोरकर यांनी सर्व शिक्षकांना शाळेत बोलावून घेतले. शाळेत आल्यानंतर सकाळी १० वाजताच्या दरम्यान सुशांत समाधान खंडारे, शाळेत आला व त्याने बोरकर यांच्या दिशेने कट्ट्यातून गोळी झाडली. त्याचा नेम चूकल्याने ती कपाटावर लागली. दुसरी गोळी झाडण्यासाठी त्याने पुन्हा कट्टा उगारला मात्र, कट्ट्याचा चाप अडकल्याने त्याने जवळचा दुसरा कट्टा काढला.

तोपर्यंत इतर शिक्षकांनी सदर माथेफिरूला पकडून खोलीबाहेर आणले. गोळीबाराचा आवाज झाल्याने गावकरीही शाळेकडे धावले. त्यानंतर माथेफिरूने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नाकाबंदी करून आरोपीला अटक केली. त्याच्या जवळून दोन कट्टे पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान आरोपी सुशांत खंडारे याला मालेगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

यावेळी त्याने पोलिसांना सांगितले की शिक्षक गजानन ईंगळे यांनी मुख्याध्यापक बोरकर यांना मारण्यासाठी ४० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी सुपारी देणारा शिक्षक गजानन इंगळे यालाही अटक केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Washim teacher gave the betel nut for the murder of the headmaster, Mathefiru shot him; Missed the game