Akola : अतिवृष्टीच्या मदतीवरून भाजप-शिवसेनेत जुंपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

Akola : अतिवृष्टीच्या मदतीवरून भाजप-शिवसेनेत जुंपली

अकोला : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राज्यातील सत्तांतरानंतरचा प्रभाव दिसून आला. अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या हानीच्या मदत घाेषणा हाेऊन १२व्या दिवशीही शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या सभेत शिंदे-फडणवीस सरकारचा जोरदार निषेध केला. यावेळी शिवसेना सदस्यांनी ‘५० खाेक्के-एकदम ओके’च्या घाेषणा दिल्या. यावर भाजप सदस्यांनी आक्रमक होत महाविकास आघाडी सरकारवर टिकास्‍त्र सोडले. एकमेकांवर निषेध नोंदवण्यावरुन शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये प्रचंड वाद झाला. परिणामी सभागृहात काही वेळ प्रचंड घामासान झाल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर झालेल्या जोरदार खडाजंगीनंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, असा ठराव सर्व सदस्यांनी मंजूर केला व तो राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

अतिवृष्टीबाधितांसाठी राज्य शासनाने १३० काेटी रुपये ८ सप्टेंबर राेजी मंजूर केले होते. मात्र अद्यापही सरकारने मदत मिळाली नसल्याचे त्याचे पडसाद साेमवारच्या (ता. १९) जि.प.च्या सभेत दिसून आले. शिवसेनेचे सदस्य गाेपाल दातकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केला.

सरकार शेतकऱ्यांची थट्‍टा करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. परिणामी शिवसेनेचे गाेपाल भटकर, गणेश बाेबडे, डाॅ. प्रशांत अढाऊ, गायत्री कांबे, कॉंग्रेसचे चंद्रशेखर चिंचाेळकर, अपक्ष गजानन पुंडकर यांनी तातडीने मदत मिळणे गरजेचे असल्याचे म्हणत सरकारवर टिकास्त्र साेडले. अतिवृष्टीबाबतच्या चर्चेत वंचितचे गट नेते ज्ञानेश्वर सुलताने, आम्रपाली खंडारे, सविता अढाऊ, सुनील फाटकर यांनीही सहभाग नाेंदवला. सभेला अध्यक्षा प्रतीभा भाेजने, उपाध्यक्षा सावित्री राठाेड, सभापती आकाश सिरसाट, स्फूर्ती गावंडे, पंजाबराव वडाळ, सीईओ साैरभ कटियार, अतिरिक्त सीईओ सुभाष पवार यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित हाेते.

असे झाले आरोप-प्रत्यारोप

शिवसेना (ठाकरे गट) शिंदे-फडणवीस सरकारने केवळ घाेषणा करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाणी पुसत असल्याची टिका शिवसेना सदस्यांनी केली. पीक विम्याच्या अग्रीम मदतीतून अनेक मंडळ वगळण्यात आली आहेत. कृषिमंत्री अकोल्यात आल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या बांंधावर गेले नाही. मात्र त्यांनी राजकीय कार्यक्रमात हजेरी लावली. अशा सरकारचा निषेध असो, अशी टीका शिवसेना सदस्य गोपाल दातकर, डॉ. प्रशांत अढावू, गोपाल भटकर, वर्षा वझीरे व इतरांनी केली.

भाजप सरकारने मदत जाहीर केली आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करणे याेग्य नसल्याचे भाजप सदस्य म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांच्या विराेधात नसून, शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहाेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर केली. दुप्पट मदत देण्याचाही निर्णय घेतला. असे भाजपचे सदस्य प्रकाश आतकड व इतरांनी शिवसेना सदस्यांना प्रत्युत्तर दिले.

वंचित सर्वच जण शेतकऱ्यांची मुलं आहोत. मुद्दे याेग्य पद्धतीने मांडल्यास प्रश्न सुटतील. शेतकऱ्यांना सरसकट व तातडीने मदत मिळण्याचा ठराव आम्ही मांडताे, असे सत्ताधारी सदस्य म्हणाले. अध्यक्ष प्रतिभा भाेजने यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर सभागृहाचे कामकाज काही वेळाने सुरळीत झाले.

Web Title: Akola Zilla Parishad Meeting Bjp Shiv Sena Govt Protest Shiv Sena Heavy Rain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv SenaAkolaBjpAkola ZP