अन् हे तं डबल पिऊन रायले वं माय...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

घरा-घरातून बाहेर पडत गृहिणींचे सूर ः अनलॉकमध्ये अनेकांनी सुरू केले पुन्हा ‘पिणे’

अकोला ः ‘आमच्या ह्यांनी तं दोन अडीच मईन्यात शिवलीसुद्धा नवती. निमुटपणे घरीच रायंत, अन् जे असलं ते खात व्हते. या दोन अडीच महिन्यात दोन पैसे बी मागं पडले व्हते वं माय, पण सरकारनं दारुचे दुकानं सुरू केले अन् हे तं डबल पिऊन रायले वं माय...’ या आणि अशा पद्धतीचे गऱ्हाणे घरा-घरातून ऐकू येत आहेत. कारण, दोन अडीच महिन्यांच्या टाळेबंदीनंतर अनलॉकमध्ये सोडून दिलेल्या काहींना पुन्हा ‘पेग भरण्यास सुरुवात केली आहे.

लॉकडाउनमुळे अगदी सुपारीपासून अंमलीपदार्थ मिळणे मुश्किल झाले होते. तंबाखू, गोवा, गुटका दारू, सिगारेट आणि अंमली पदार्थच्या किंमती दुप्पट ते तिप्पट वाढल्या होत्या. त्यामुळे व्यसनींच्या खिशाला चाट बसत होती. त्यांना व्यसन करणे परवडेना झाले होते. त्यातील काही मंडळींनी लॉकडाउनच्या संधीचा फायदा घेत सर्व व्यसन बंद करायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी या काळात संयम देखील पाळला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय देखील खुश झाले होते. मात्र सर्वांचा हा आनंद आणि निर्व्यसनी होण्याचे व्रत जास्त दिवस टिकले नाही. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात व त्यापूर्वी दिलेल्या काही सवलतींमुळे संयम बाळगणारी व अनेक दिवसांपासून वाइन शॉप उघडण्याची वाट पहात असलेली मंडळी दारूच्या दुकानांसमोर रांगेत उभी होती.

आणि तो पुन्हा सुरू झाला
कोरोनाने कधी नव्हे ते अनेकांची तलफ बंद केली होती. यामुळे परिवारही आनंदी राहत होता. मुलांसोबत वेळही घालविल्या जात असल्याने मुलही आनंदी झाली होती. मात्र, अनलॉकमध्ये दारुची दुकाने उघडली आणि मद्यपी बेफाम झाले. अनेकजण आता तोंड लपवून दारुच्या दुकानापुढे उभे दिसत आहेत. आणि परिसरात एकच चर्चा सुरू आहे ‘आणि तो तर पुन्हा सुरू झाला’.

दारु सोडवायची तर मग संपर्क साधा
सध्या कोरोनामुळे देशभर टाळेबंदी असली तरी ए.ए. ने आपली सेवा सुरूच ठेवली. दारूने आपल्या जीवनात केलेली धूळदाण व यातून सुटकेसाठी काय मार्ग आहे, याची देवाणघेवाण ए. ए. च्या नियमित सभांमध्ये होत असते. दारूची आसक्ती इतकी प्रचंड असते की मद्यपी व्यसनापायी कुठल्याही थराला जाऊ शकतात, आत्महत्या देखील करू शकतात. टाळेबंदीच्या काळात अनेकांना दारू न मिळाल्याने झोप न येणे, चिडचिड, अस्वस्थता, उदासी, कौटुंबिक कलह व मानसिक संघर्षांचा त्रास झाला. यापैकी शेकडो लोकांनी ए. ए. च्या हेल्पलाईन वर संपर्क साधला. या मंडळींना त्यांच्या त्रासांवर सल्ला-सूचना तर मिळाल्याच, पण दारूपासून कायमचे दुर राहण्याचा मार्गही मिळाला आहे. 85 वर्षे अखंड सुरु असलेली ही विनामूल्य सेवा आपल्या शहरात कार्यरत असून, नागरिकांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन यानिमित्ताने ए.ए. मार्फत करण्यात आले आहे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And he drank a double drink and left ...